सुधागडावर महाद्वाराला कवाड बसविण्यास ज्या ज्या निष्ठावंत शिवपाईकांनी, धुलीकणांनी मोलाची कामगिरी साधली त्यांच्या सन्मानास्तव.... हे कवणपुष्प....



नटला दिमाखदार, सुधागड नटला दिमाखदार
त्रिशतकांती कवाड लाभे, ऊघडले महाद्वार

शिवकाळी या स्वराज्याप्रति
सुधागडाची दूर्ग आक्रुती
पाहुनी जडली शिवबा प्रीति
"बुलंद होई राजधानी का?" राजा करी विचार

शिवकाळाचे वैभव सरले
कालचक्राचे जाते फिरले
परवशतेचे जगणे ऊरले
गिळून टाके गडास अवघ्या, दूर्लक्षित अंधार

रणफंदी बा रायगडीचे
शोभे मावळे गतजन्मीचे
दुःख जाणिले सुधागडाचे
धूलीकणांनी मनी ठाणला, संवर्धन निर्धार

ठिणगी चमके एक मनातुनी
सहस्त्र वणवे चेतले यातुनी
शिवकार्याचा वसा घेऊनी
हा हा म्हणता घेऊ लागले, स्वराज्य पुनः आकार

शिवभक्ती ये दाटूनी पोटी
महाद्वाराच्या पूर्तिसाठी
रणवीरांच्या लवल्या पाठी
शत शत राबती हात, मुखी शिवबा जयजयकार

कुणी धनाने, कुणी मनाने
प्रज्ञेने कुणी, कुणी श्रमाने
अवघे झटले एक दिलाने
धूसर होते स्वप्न जाहले मूर्तिमंत साकार

मनी ना कुठले किंतु, परंतू
वानरगण जणू बांधे सेतू
तसा शिवराय मनीचा हेतू
करण्या साध्य शक्ती ऊफाळे, मनातुनी अनिवार

हर हर महादेव देई गर्जना
शिवरायांची कोणी घोषणा
ठरती अवघ्या शक्ती, प्रेरणा
ऐकूनी त्यासी मनीमानसी, साहस करी संचार

महाद्वाराशी कवाड भिडले
जयघोषांनी नभ गडगडले
सत्कार्याचे सार्थक झाले
पुष्पपाकळ्या बरसू लागल्या, ऊधळला भंडार

संघकार्य हे अचाट पाहुनी
शिवरायांच्या हर्ष मनातुनी
अश्रु सांडती शिवनेत्रांतुनी
अभिमानाने वदती स्वर्गी, "हे स्वराज्य वारसदार"

त्रिशतकांती कवाड लाभे, ऊघडले महाद्वार....



लेखन- संतोष अंकुश सातपुते
छायाचित्र साभार- अतुलदादा मोरे


Comments

  1. खूप खूप आभार दादा. खूप छान लिहिलंय🙏🙏🚩

    ReplyDelete
  2. खुप सुंदर. बा रायगड परिवार करत असलेल्या कार्यास समर्पसम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १