शिवराजाभिषेक
शिवराजाभिषेक! केवळ एका व्यक्तिस सिंहासनावर बसविण्याचा हा सोहळा मुळीच नव्हता. ती होती एक संकल्पपूर्ति! माहुलीवर पदरी वैफल्य आलेल्या शहाजीराजांची संकल्पपूर्ति! पुण्याच्या काळजात रूतलेली पहार ऊपसणाऱ्या जिजाऊंची संकल्पपूर्ति! रोहिडेश्वराच्या गाभाऱ्यात एका चिमुरड्याने घेतलेल्या भीष्मप्रतिज्ञेची नि त्यासाठी ऊपसलेल्या भगीरथ प्रयत्नांची संकल्पपूर्ति...
स्वामीनिष्ठेपुढे बादशहाचा कौल लाथाडणाऱ्या मुरारांची! गजापुरच्या खिंडीत तोफेच्या सरबत्तीची वाट पाहणाऱ्या बाजींची! क्षणात वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजींची! येसाजी! तानाजी! शिवा- बाजींची संकल्पपूर्ति!
या मातीसाठी जिवाचा बेलभंडारा ऊधळणाऱ्या कित्येक ज्ञात- अज्ञात वीरांची संकल्पपूर्ति! कैक सुवासिनींच्या सुन्या कपाळांची संकल्पपूर्ति! कैक मातांच्या विझलेल्या वंशदिव्यांची संकल्पपूर्ति! या अवघ्या अवघ्यांची संकल्पपूर्ति मूर्तिमंत रूपात अवतरली या रायगडी!
रामदेवराय यादवाच्या रूपानं पदच्यूत झालेली महाराष्ट्र अस्मिता शिवछत्रपतींच्या रूपानं पुन्हा मानानं सिंहासनाधिष्ठीत झाली. देवगिरीवर मरणासन्न झालेल्या महाराष्ट्रधर्मास या रायगिरीवर नवसंजीवनी लाभली.
शिवछत्रपती सिंहासनाधीश झाले.सप्त सागर, शतसरीता नि सहस्रकोटी रयतेच्या आसवांनी राजा अभिषिक्त झाला. आपला राजा! आपलं राज्यं! आपलं सिंहासन! आपली छत्रचामरं! आपला शक! आपलं नाणं! आपला ध्वज! आपली भाषा! आपला धर्म! आपली संस्क्रुति! सारं सारं आपलं.
राजाभिषेक केवळ सोन्याच्या सिंहासनाचा थाट दाखवण्याचा नव्हे तर या मातीच्या सन्मानास्तव घातलेला घाट होता. केवळ स्वतःस जलाभिषेकाचा नव्हे तर अधम रक्तरंजित भूमातेस पावनस्नान घालण्याचा! ऊंची वस्त्रे घालून नटण्याचा नव्हे तर विवस्त्र झालेल्या मायमराठीस सन्मानानं महावस्त्र पांघरण्याचा! तोफगोळ्यांच्या आतिषबाजीचा नव्हे तर मुजोर सत्ताधिशांचा थरकाप ऊडवण्याचा सोहळा होता. स्वतःस राजा म्हणून मिरवण्यासाठी नव्हे तर रयतेचे राज्य आले हे ठणकावून सांगण्याचा सुखसोहळा होता.
राजाभिषेकानं अवघं अवघं स्थिरावलं. रायगडीच्या ऊत्ताल कड्यांवरून आनंदाचा कडेलोटच झाला. तटाबुरूजांवरून गरजणाऱ्या तोफा दसदिशांना सांगत सुटल्या "कुण्याही फलाण्या बिस्तान्या खानानं त्याची हुमानदांडगी टोळधाड आणावी आणि आमच्या मुलखी शिरावं. शेतंपोतं जाळावी! घरदारं पेटवावी! मंदीरं मूर्ती फोडाव्या! गाईगुजी कापाव्या! लेकीबाळींच्या पदरास..... नाही नाही! आता हे खपवून घेतलं जाणार नाही. या भुमीकडे वटारलेला प्रत्येक डोळा फोडला जाईल. ऊगारलेला प्रत्येक हात तोडला जाईल. धर्मावर ऊठणारा प्रत्येक अफजल असाच ऊभा फाडला जाईल खबरदार! खबरदार!! खबरदार!!!...."
लेखन - संतोष अंकुश सातपुते
फोटो- नेट साभार
राजाभिषेक शब्दातून अनुभवन्याच सुख दादा 😍🔥
ReplyDeleteधन्यवाद दादा🙏🙏🙏
Deleteस्वराज्य प्रेम पुन्हा एकदा जागवायचं ते असं...खूपच छान लेखन ..हेच स्वतंत्र भारताचे भविष्य आहे .🚩जे लेखन हृदयास भिडतं ते प्रेम कृतीत दिसायला वेळ नाही लागत.😇😇😇
ReplyDeleteजगदंब...😇
ReplyDelete