दुर्गराज राजगड भाग १
राजगड! मुरुंबदेवाचा डोंगूर! बिरमऋषीचा डोंगूर! ब्रह्मर्षीचा पर्वत. ईये महाराष्ट्र मुलूखाचे ठाई वसला राजगड. अनादी काळापासून. ऊंच गगनात डोकं खुपसून. पायतळीची रहाळीची माणसच काय, जनावरदेखिल या खडककड्याशी झोंबायला धजावायचं नाही.
अन् एकेदिनी हा गगनकडा येंगून वर चढला तपस्वी बिरमऋषी. या विजनस्थळी. एकांती! जनस्थानापासून विमूक्त अशा जागी. राजगडास पहीला मानव स्पर्श घडला तो असा. या राजस, तपस्वी साधकाच्या स्पर्शानं थरारला राजगड. तो बसला तपाला. अन् घुमू लागला अभिमंत्रीत वेदघोष अवघ्या डोंगरावर. दशदिशांनी! राजगडही विरक्त झाला!
टीचभर घरासदेखिल घरपण देण्यास लागतो स्त्रीचा हात. अन् हेच ध्यानी धरून त्या चारसहा सवाष्णी गड येंगून वर आल्या. दक्षिण बाजुनी मळ्याचा अवघड दांड मोठ्या ठसक्यात चढून आली काळेस्वरी. गुंजिवण्याच्या निबीड रानातून वाट काढीत दारावर येऊन विराजली गजांतलक्षुमी! बालेकिल्ल्याखालच्या गच्च रानात विसावली रेडजाई! बालेकिल्ल्याचा आडदांड ऊभार येंगून ऊगवतीस तोंड करून विराजली मायजननी. अन् चोरदिंडीच्या वळणवाकणातून कड्या कपारीस भिडून ऊत्तर अलंगेवर वसली माय पद्मावती.
आधीच गड तपस्वीच्या जपातपानं पावन झालेला त्यात या जगद्जननींचा मांगल्याचा, वात्सल्याचा, अभयतेचा, शुचितेचा, सोज्वळतेचा अन् वैभवतेचा वरदहस्त अवघ्या गडावर रातदिस फिरू लागला. अन् पाहता पाहता पालटलं रूप राजगडाचं.
गडरहाळ दिसामासानं वसू लागला. अवसेपुनवेनं हसू लागला. बेवसाऊ झाला. झुंजार बुरूजाखालच्या मढे दरवाजानं विघ्नहर्ता गणोबा आला. डुब्याच्या गच्च गर्दावळीच्या वळचणीतुन महावीर हनुमान पावता झाला.
पद्मावतीच्या सोबतीला रामेस्वर महादेव विराजमान झाला.
पद्मावतीच्या सोबतीला रामेस्वर महादेव विराजमान झाला.
अवघ्या देवदेवतांचं पंचायतान आपापल्या ठाई वसलं. सकल राजगडच देव्हारा झाला होता. आता मांडायचं होतं झोपी गेल्या, मरणासन्न मुलखासाठी जागरण! जागरण स्वराज्याचं. जागरण मराठमुलखाचं! गोंधळ महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी! वाढवण्यासाठी!!!
राजगडाचा बालेकिल्ला, तिनही माच्या, तटबंदी, बुरूज, सोपान, भुयारे, द्वार-गवाक्षे, दगडचिरे अवघे आतुरतेनं वाट पाहू लागले... टुकटुकू लागले... आवघे आवघे खोळंबले... अधीर झाले स्वराज्यदेवतेच्या आगमनासाठी! तोफांचा संबंळ धडधडू लागला. ढालींचा डफ कडकडू लागला. तलवारींची तुणतुणी खणखणू लागली. ढालकाठीपाशी भगव्या जरीपटक्याची दिवटी फुरफुरू लागली... अन् पालीच्या चिरेबंदी महाद्वारातून, मेणापालखीतून पावती झाली या जागरणाची मुख्य दैवतं. तुळजाभवानीच्या रूपानं माय जिजाई अन् तिच्या सिंहाच्या रूपानं... सिऊबा... अन् गरजले आवघेजन आईराजा ऊधो..ऊधो...
लेखन- संतोष अंकुश सातपुते
छायाचित्र- प्रेमाभार, सुप्रसाद पुराणिक
छायाचित्र- प्रेमाभार, सुप्रसाद पुराणिक
Comments
Post a Comment