माझे माहेर रायगड
पावसाळा नुकताच ऊंबरठ्यावर येऊन ऊभा राहीलेला. चार सहा पाऊस गाठभेट घेऊन गेलेले. त्यावेळी मी, केतन, सागर, नंदन चौघेही रायगडी निघालो. मुक्काम किती? ऊणेपुरे आठ दिवस! ते आठ दिवस आम्ही शिवकाळातच जगत होतो.कोणी विचारेल काय केलं रायगडी या आठ दिवसात? तर काहीच नाही! चौघेही सासुरवाशीनीसारखे संसार सोडून माहेराला आलो होतो. माहेरी थोडीच काय करायचं असतं! ईथं फक्त बागडायचं! माहेरच्या गोतावळ्यात मनमुराद रमायचं! त्यांच्याकडून फक्त लाड पुरवून घ्यायचे. दिवस, तारीख, वेळ यांच्याशी काडीमोडच घेतलेला. कोणीही विचारावं आज दिवस कोणता? फिरायचा! आणि सकाळ, दुपार, सांज, रात्र याशिवाय दूसरी वेळ नव्हती.
सकाळी ऊठून बाम्हण वाड्याच्या ओहोळेनी खाली वाघदरवाज्याकडे निघायचं. ही वाट जरा अडचणीची! तरी निघायचो. मरणाची खेकडं गोळा करीत. पावसानं झऱ्यांना पाझर फुटलेला. वर ओहोळेच्या ऊगमाशी थेंबथेंब ठिपकणारं पाणी खाली मोठमोठ्या डकल्यातून शिगोशिग भरून वाहावयाचं. इथं भडाभडा पाणी अंगावर घेत आंघोळी ऊरकल्या की आम्ही वाऱ्यासारखे गडावर दसदिशी ऊंडारायला मोकळे.
जायचं कुठं हा प्रश्नच पडत नव्हता. फुटतील त्या वाटेने अथवा वाट नसेल तिथेही जात होतो. पाहत होतो. करवंदी, निरगुडीच्या आडवणात सावलीत बसत होतो. भुयारांमधून डोकावत होतो. रायगडाचा ऊभार निरखित होतो. पण काही जागा मात्र त्या त्या वेळी ठरलेल्या. सकाळी वाघदरवाजा! त्यांनतर सिंहासनपाशी मुजरा! दुपारी स्तंभात किंवा भवानीच्या गुहेत किंवा जगदीश्वराच्या राऊळात झोपणं! सांजवताना हिरकणी बुरूजावरून अथवा टकमकीवरून अवघा आसमंत न्याहाळणं. बर्फ जसा थेंब थेंब वितळतो तसा मावळतीस सूर्य थेंब थेंब विरघळत असतो. अवघ्या पश्चिमेवर लालिमा पसरते. त्या थेंब थेंब विरघळणाऱ्या नारायणासोबत आपणही विरघळत असतो शिवकाळात. मग जमायची मैफील कविता, पोवाडे, भूषणाचे छंद... दूरवर झांझरता दिसणारा जिजाऊंचा वाडा! ही ऊजव्या अंगास महाद्वाराची तटबंदी! डावीकडे खाली विशाल काळ नदीचे खोरे! घोंघावणारा वारा. अगदी अंधार पडेपर्यंत बसायचो. मग अंधारातच निघायचो सदरेवर. वाट तशी पायाखालचीच झालेली. सदरेवर मुजरा करायचा. धन्याच्या पायरीशी बसायचं. किती किती काय काय आठवायचं. जे ठाऊक ते इतरांस सांगायचं. किंवा मग त्या जाणत्या राजास मुकेपणानं डोळ्यात साठवायचं.
दिक्क अंधारल्यावर औकीरकर मावशीकडे जेऊन रात्री समाधीपाशी थांबायचं! या माऊलीशी मनीचे गूज ऊकलीत. जोवर ही माऊली या रायगडी आहे तोवर अवघ्या महाराष्ट्रासाठी हे सुखाचं माहेरपण आहे. असं किती किती कल्पावं. समाधीवर डोकं टेकवून शांत बसावं. अवघ्या गडभर कलकलणारे आम्ही यास्थळी मात्र अगदी चिडीचाप. कोणास शांत बसा म्हणून सांगायची गरजही नसायची. या स्थळी एकटेपणा नसतो पण एकांत मात्र मोठा. रात्री चंद्राच्या चांदण्यात समाधीचा अभिषेक पहायचा. एका तेजप्रतापी सूर्यास हा चंद्र आपल्या शीतळाईनं जोजवित असायचा.
मग निघायचं निजानिजेच्या मुक्कामास. अवघ्या गडावर कुठंही! कधी बाजारपेठेतून रात्रीचं वारं झेलायचं! कधी नगारखान्याच्या वरच्या मंडपात चंद्र आणि धावत्या आभाळाचे खेळ न्याहाळायचे! कधी स्तंभाच्या महीरपीतून कोरीव आकाश निरखायचे! कधी भवानीच्या गुहेतून कातळकोरीव सह्याद्रीरांग डोळ्यात साठवायची! तर कधी भर पावसात गड ऊतरून निसणीच्या गुहेत गुडूप झोपायचे.
सात- आठ दिवस असं गडावर गणागणा हिंडत होतो. धूईधुक्यात हरवत होतो. पावसात चिंब होत होतो. ऊन्हात रापत होतो. थंडीत हातपाय पोटाशी घेत कुडकुडत होतो. पण घरी परतायची सय काय होत नव्हती.
अखेर गड ऊतरायच्या दिवशी सकाळी ऊठून हात-तोंड धुऊन सिंहासनापाशी मुजरा घालावयास गेलो. बाजारपेठेच्या वाटेनी जाताना तर डोळे भरून आले. गेले आठ दिवस अगणित वेळा या वाटेने केलेली पायपीट आठवली. मावशींस भेटलो. निरोप घेतला. अन् चौघेही समाधीपाशी आलो. सकाळ संध्याकाळ या ठिकाणी येत होतो. घटका घटका बसत होतो. राजांशी मनातील गूज बोलत होतो. आज मात्र पाचही जण शांत होतो. आम्ही चौघे नि पाचवी समाधी. वाटत होतं रोज आम्ही यायचो सोबतीला आता कोण असेल राजांसोबत बोलायला. पावलं खरंच जड झालेली.रायगडानी अगदी भरभरून आमचं माहेरपण केलेलं. सोबत वाणवळा म्हणून अमोप सोनेरी आठवणींची शिदोरी दिली. जडभरल्या पावलांनीच गड ऊतरू लागलो...
मनात तुकारामबाबांचा अभंग घोळत होता... फक्त त्यांच्या पंढरपुरच्या जागी नाव रायगडाचे येत होते...
रायगडीचे भूत मोठे।
आल्या गेल्या झडपी वाटे।।
बहू खेचरीचे रान ।
जाता वेडे होय मन।।
तेथे जाऊ नका कोणी।
जाता न ये परतुनी।।
जो जो रायगडी गेला।
पुन्हा माघारी न आला।।
आल्या गेल्या झडपी वाटे।।
बहू खेचरीचे रान ।
जाता वेडे होय मन।।
तेथे जाऊ नका कोणी।
जाता न ये परतुनी।।
जो जो रायगडी गेला।
पुन्हा माघारी न आला।।
खरंच अजूनही स्वतःस हाच प्रश्न विचारतोय स्वतःला कि, त्या दिवशी गड ऊतार होताना मी गड ऊतरून आलो की महाद्वारातून पुन्हा परतून वरती गेलो. शरीरानं इथं वावरत असलो तरी मनानं मात्र तिथंच भटकतोय माझ्या माहेरी. रायगडावर!!!
लेखन, फोटो- संतोष अंकुश सातपुते
Comments
Post a Comment