या मराठमुलुखी बाळ जन्मले, शिवबा छत्रपती...
गुलामगिरीच्या काळ्याकुट्ट घोंगडीखाली झोपलेला महाराष्ट्र त्या राती खडबडून जागा झाला. अवघा सह्याद्री धोतराचा सोगा धरून, नीऱ्यांचा घोळ सावरीत धावू लागला. त्यासोबत होती त्याची दहाबारा तरणी, हुमानदांडगी पोरं. अन् चिमखड्या परकरी पोरी. सह्याद्रीची ती पोरं म्हणजे हे राकट गडकोट आणि चिमखड्या पोरी म्हंजी त्यावरून धावणाऱ्या नद्या. ही सगळीच नटूनथटून धावत होती. अन् त्यांच्यासोबत पदराआड बाळंतविडा झाकून धावत होती महाराष्ट्र मुलखातील देवदेवता. कुठं? जुन्नरपेठेत!कशाला???
निद्रीत अवघा महाराष्ट्र हा, ऊठला खडबडून
पहा देई भिरकावून
परवशतेची जख्ख घोंगडी, टराटरा फाडून...
पहा देई भिरकावून
परवशतेची जख्ख घोंगडी, टराटरा फाडून...
सह्यगिरीच्या अंगोपांगी, घेई आनंद ऊडी
हर्ष कडेलोट दोथडी
त्रिशतकांती आज उदेली, शुभशकुनाची घडी
हर्ष कडेलोट दोथडी
त्रिशतकांती आज उदेली, शुभशकुनाची घडी
धरूनी धोतरसोगा, निऱ्यांचा सावरूनीया घोळं
ऐटीत देई मिशीला पीळ
सह्याद्री हा तडतड चाले, होऊन अति व्याकूळं
ऐटीत देई मिशीला पीळ
सह्याद्री हा तडतड चाले, होऊन अति व्याकूळं
तयासोबती तशीच व्याकूळ, हुमानदांडगी पोरं
अहो त्याचीच ही लेकरं
पुढे धावती परकरी पोरी, चिवचिव करती फार
अहो त्याचीच ही लेकरं
पुढे धावती परकरी पोरी, चिवचिव करती फार
ऊभा आडवा रगेल बांधा, पोरं ही राकट
पीळदार देह दणकट
सांगू लागता जणू वाटते वीजेचा कडकडाट
पीळदार देह दणकट
सांगू लागता जणू वाटते वीजेचा कडकडाट
रूबाबदार प्रचंडगड तो, लोहदूर्ग बहू देखणा
कळीदार तुंग तिकोना
राजबिंड्या राजगडा या जगात नाही तुलना
कळीदार तुंग तिकोना
राजबिंड्या राजगडा या जगात नाही तुलना
फेटा बांधुनी प्रतापगड, नरवीर गड कोंढाणा
गड साल्हेरी ना ऊणा
अन् रायगडासह पहा चालती, ऐटदार लिंगाणा
गड साल्हेरी ना ऊणा
अन् रायगडासह पहा चालती, ऐटदार लिंगाणा
चिवचिवाट त्या पोरींचाही, नावे सांगती कुणी
ही पवना, गुंजवणी
कानंदी ही, मुळा मुठेसह पहा ती ईंद्रायणी
ही पवना, गुंजवणी
कानंदी ही, मुळा मुठेसह पहा ती ईंद्रायणी
पुढे चालती क्रुष्णा-कोयना, भीमा, गोदावरी
नजराणा घेऊन करी
महाराष्ट्राच्या शतसरीता या, चालल्या कोण्या घरी
नजराणा घेऊन करी
महाराष्ट्राच्या शतसरीता या, चालल्या कोण्या घरी
गर्भरेशमी कुंची घेऊनी, धावे पंढरीनाथ
या दख्खनच्या मुलुखात
साखरा वाटीत घोड्यावरूनी, निघे म्हाळसाकांत
या दख्खनच्या मुलुखात
साखरा वाटीत घोड्यावरूनी, निघे म्हाळसाकांत
अंबाबाई घे द्रुष्टमणी, तुळजाई घेई टोपडे
कुणी वाकी, मनगटी, तोडे
पदराखाली घेई झाकुनी, राजस बाळंतविडे
कुणी वाकी, मनगटी, तोडे
पदराखाली घेई झाकुनी, राजस बाळंतविडे
लगबगतेनं अवघे निघती, कोणाच्या भेटी
येई ते मावळ जुन्नरपेठी
अहो शिवनेरीवर सूर्य जन्मला, मायजिजाई पोटी
येई ते मावळ जुन्नरपेठी
अहो शिवनेरीवर सूर्य जन्मला, मायजिजाई पोटी
अष्टदिशा या फेर धरूनी, गाऊ लागे पाळणा
सूर्य चंद्र फिरे खेळणा
बाळाचे या तेज न्याहाळून, दिपल्या तारांगणा
सूर्य चंद्र फिरे खेळणा
बाळाचे या तेज न्याहाळून, दिपल्या तारांगणा
जिजाऊच्या कुशीत निजला, साजिरा चिमणा बाळ
कुरळे जावळ भूषवी भाळ
नजर ना लागो म्हणुनी लावी, जाणत्या कुणी काजळ
कुरळे जावळ भूषवी भाळ
नजर ना लागो म्हणुनी लावी, जाणत्या कुणी काजळ
नाक इवलेसे, डाळींबी हे गाल ओठ साजिरे
लालचुटूक हात गोजिरे
बाळमुठीत या महाराष्ट्राचे भाग्य ऊजळले पुरे
लालचुटूक हात गोजिरे
बाळमुठीत या महाराष्ट्राचे भाग्य ऊजळले पुरे
शिवनेरीच्या तोफांना द्या त्रिवार सरबत्ती
साखरा वाटीत अवघ्यांसी चौफेर ऊधळले हत्ती
चिमुकलं हे स्वराज्यस्वप्न, पाहुन हरखे जन चित्ती
अन् मराठमुलुखी बाळ जन्मले, शिवबा छत्रपती
आमचा शिवबा छत्रपती....
साखरा वाटीत अवघ्यांसी चौफेर ऊधळले हत्ती
चिमुकलं हे स्वराज्यस्वप्न, पाहुन हरखे जन चित्ती
अन् मराठमुलुखी बाळ जन्मले, शिवबा छत्रपती
आमचा शिवबा छत्रपती....
लेखन-संतोष अंकुश सातपुते
अप्रतिम चित्रक्रुति- नेट साभार🙏🙏
अप्रतिम चित्रक्रुति- नेट साभार🙏🙏
दादा😍🙏
ReplyDeleteनुसत वाचतानाच अंगात वारं भरतयं ..
ReplyDeleteजन्मप्रसंगाचा तो सोहळा डोळ्यासमोर हुबेहूब येतोय ,
सगळी नुसता सनई-चौघड्यांचा स्वर ऐकू येतोय ,
ढोल-ताशांचा नाद सुरू झालंय नुसता ....!!
Kamal ahes tu ani tuze likhan apratim.. god bless
ReplyDeleteधन्यवाद दादा🙏🙏🙏
Delete