सह्याद्री... बापदाद्यांची मिरासदारी




खरंच कधी कधी सुचत नाही, का हे डोंगर इतकं वेड लावतात? इथले खळाळणारे झरे ओढे का भूलवतात? राजगड, रायगडात असं काय आहे की त्यास पाहता जीव खुळावतो? या नाळी, घाटवाटा पाहील्या की कोणाच्या पाऊलखुणा दिसू लागतात? हे बुरूज तटबंद्या पाहील्या की का छाती फुटावी इतका मोठा श्वास आपण घेतो?
जवाब शोधत निघालो की मन भूतकाळावर बसून मागं मागं दौडत निघतं. अन पोहोचतो तीनशे वर्षापुर्वीच्या एका डोंगराच्या आड वसलेल्या खेड्यात. पुण्याच्या मावळतीस, कोरबारस मावळात, नानिवली गावात!

पंधरा-वीस केंबळानी शाकारलेली घरं! गावाच्या शिवेवरचा हात ऊगारलेला मारूतराया! शेंदूर फासूफासून मूळ मुर्तीतला घडीवपणा पार लोपलेला. पण डोळे असे वटारलेले की काय बिशाद कोणत्या संकटाची गावाची शिव ओलांडायची. मळलेल्या धूळवाटेवरून आत निघालोय. पांदीच्या दोन्ही अंगानी आंब्या जांभळीनी वाटेवर सावली धरलेली.  दोन्ही बाजवांनी निरगुडीचा दाट कुसवा.  हे काय म्होरं गाव! तो कळस दिसतोय तो कमळजाईचा! बाजूच्या पारावर, भल्या ढंगाळ्या फणशीच्या सावलीत चार म्हातारी लंगोट लावलेली गप्पा हाणत बसलेली. बाजूस रणरणत्या मातीत पोरांचा इटीदांडू रंगलाय. अंगणात सावलीत आयांबरोबर चिमखड्या पोरी वाळवणं टाकीत आहेत.

आज्ज्यांच्या गप्पा रंगल्यात-
"साबाजी यरवाळी कसली रं गडबड व्हती दारी?"
"आरं बाबा... बलावणं आलं हुतं राजगडास्नी! थोरल्या राजाचा सांगावा! कंचितरी मूहीम हाय. म्हणूनशान थोरला रावजी येरवाळीच रवाना झाला."

या वरच्या प्रसंगातील रावजी हा मुळीच काल्पनिक नाही. आपल्या हरएकाच्या बापदाद्यापैकी कोणीतरी रावजी तिथं राजगडी-रायगडी मुजऱ्यास गेलाच असेल. राजाचा शेबासकीचा हात त्याच्याही पाठीवर ऊमटला असेल. जिजाऊनी भरीवलेला मायेचा घास त्याच्याही मुखी पडलाच असेल. राजांचं रक्षण केलं म्हणून सईबाईसाहेबांनी या आपल्या धर्माच्या भावास ओवाळलं असेल.

याच आपल्या पूर्वजाचं रक्त इथच कुठतरी या सह्याद्रीच्या आडवाटेवरी जुझात सांडलं असेल. दुस्मनास चिरताना दिलेल्या हर हर महादेवाच्या गर्जनेनं अवघं रान थरारलं असेल. भळभळत्या जखमेतून सांडलेलं आसूद ओढ्या नदीच्या पाण्यातून वाहतं झालं असेल.

या असल्या वीररक्ताचा अंश असलेल्या पाण्यावर आपली शेती पोसली. तेच अन्न आपण खातोय. तेच पाणी. तोच वारा.  पिढ्यानपिढ्या तो वीर अंश असाच वाहतोय. म्हणतात ना रक्तच रक्ताकडं धाव घेतं. म्हणूनच सख्यासह्याद्रीस पाहताच हे अंगीचं रक्त ऊसळ्या मारतं. गडकोट चढताना सळसळतं. घाटवाटा ऊतरताना ऊधाणतं. शिवरायांच्या आठवणीनं व्याकूळतं.


खरच लाख पुण्याई म्हणून या महाराष्ट्रभुमीत ऊपजलो, निपजलो. कारण परमुलूख लोकांसाठी सह्याद्री, गडकोट केवळ पिकनिकच्या जागा. पण आपल्यासाठी ही आपल्या बापदाद्यांची मिरासदारी आहे. हे केवळ कोण्या देशमुखाचं वतन नाही, की कोण्या पाटलाची मोकदमी नाही. हा रांगडा मुलूख आपल्या अवघ्यांचाच. तो वारसाहक्कानं आपल्यास मिळाला. आता आपली जबाबदारी, या अमूल्य सह्याद्री जहागिरीस तीळभरही धक्का न लावताहा असा बुलंद, बेलाग नि निर्मळ सह्याद्री पुढील पिढ्यांस सुपूर्द करणे.
 
लेखन, फोटो- संतोष अंकुश सातपुते

Comments

  1. नेहेमीप्रमाणे भन्नाट

    ReplyDelete
  2. खरंय दादा 😍😍खुप सुंदर वर्णिलय तुम्ही!❤️💯

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १