बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण!
बाई जिजाऊ तुझ्या चरणी लोटांगण! खरच कुठल्या मातीपासून घडली आई तू? कोण होता तुला घडवणारा? तुझं नशीब लिहीताना तर सटवीसुद्धा ऊर फुटून रडली असेल. काय कमी यातना, भोग लिहले का बाई तिनं तुझ्या भाळी!
ओसाडलेली गावं, दुभंगलेल्या वेशी, कोसळलेली घरं, पडलेली मंदीरं, भंगलेल्या मुर्ती, हंबरणारी गाईगुजी, गांजलेली रयत, आक्रोशणाऱ्या अबला अवघे अवघे कल्लोळून, आक्रंदून, टाहो फोडफोडून पुकारत होते तुला! अन् तू आलीस अवघ्यांची मायमाऊली होऊन. ओसडलेली गावं वसवण्या! दुभंगलेल्या वेशी सांधण्या! कोसळत्या घरा बांधण्या! भंगल्या मुर्ती सावरण्या! धुमसणारी शेती फुलवण्या! हंबरणाऱ्या गाईगुजीस चारा भरवण्या! पिचलेल्या मन आणि मनगटास नवी ऊभारी देण्या... अवघ्या अवघ्यांस आपल्या शितळ पदराखाली घेण्यास!
आजन्म चिंतेच्या ज्या चिता तुझ्या भोवताली भडकल्या त्याची झळ तू मुकाट साहिली पण तुझ्या पदराआड घेतलेल्या लेकुरवाळ्या महाराष्ट्रलेकरास त्याची झळ लागो दिली नाहीस. जिजाऊ! मोठ्या आभाळधीराची आहेस बाई तू! कणभरही तू डगमगली नाहीस! कुठून आलं ईतकं साहस तुझ्यात!
राजगडी काळेश्वरी बुरूजापाशी धडाडली चिता! अन् अवघ्यांच्या काळजाचा थरकाप ऊडाला. एवढा आडदांडगा राजगड पण तो सुदीक गहीवरला. तोरण्याच्या ऊरात धडकी भरली. काय होणार पुढं. पण तू मात्र घनगंभीर शांत होती. हिरवं लुगडं नेसून! कपाळभर मळवट भरून! वज्रचुडा लेवून! थोरल्या महाराज साहेबांच्या, शहाजीरांजांच्या पादुका ऊरी कवटाळून.. शांत ऊभी. झळाळणाऱ्या, ऊफाळणाऱ्या ज्वाळांकडे बघत तुझी समाधी लागलेली. सती जाणारच या निर्णयावर अचल! अढळ! अभंग!
गगनभेदी टाहो फोडला राज्यानं. आईवेडं पोर ते. धाय मोकलून हंबरडा फोडू लागलं. आई...आई...आई... म्हणून हाकारू पुकारू लागलं. तुझ्या पायास मिठी घालून बसले लेकरू. अगं त्याची तगमग बघून तर बारा मावळांचही काळीज गहीवरलं! अन् तुही थांबली. पण पुत्रप्रेमासाठी. छे छे.. तू थांबली असशील स्वराज्यस्वप्नाच्या परिपूर्तिसाठी. आपण सती जाता शिवबाचं मनोधैर्य खचेल आणि खचलेलं मन स्वराज्य रचूच शकणार नाही हे तू अंतरी ऊमगलं असेल. धन्य बाई तू! अगं ध्येयासाठी मरणं कठीणच पण त्याहूनी महाकठीण ध्येयासाठी जिवंत राहणं...
शिवछत्रपती सिंहासनाधीश झाले.सप्त सागर, शतसरीता नि सहस्रकोटी रयतेच्या आसवांनी राजा अभिषिक्त झाला. आपला राजा! आपलं राज्यं! आपलं सिंहासन! आपली छत्रचामरं! आपला शक! आपलं नाणं! आपला ध्वज! आपली भाषा! आपला धर्म! आपली संस्क्रुति! सारं सारं आपलं. सगळ जुनच पण नव्यानं तरारून मोहोरलेलं. ईष्ट कार्य साधले. जे जे वांच्छिले ते पूर्णत्वास नेले. साल्हेरी अहीवंतापासून चंदी कावेरीपर्यंत स्वतंत्रभूमी...
अन् राजाभिषेकाच्या अवघ्या अकराव्या दिवशी तू शिवरायाचा, या स्वराज्याचा, या जगाचा निरोप घेतलास. अवघी हयात ज्या ध्येयासाठी जगलीस ते पूर्ण होताच सर्व मायेचे पाश तोडून तू स्वर्गीची वाट धरलीस. हा म्रुत्यू नव्हे. ही आहे समाधी. ध्येयपूर्णत्वाची चिरसमाधी! आपलं जगकल्याणाचं कार्य होताच जे थोर संत, तपस्वी घेतात ती समाधी. अशीच एक दिव्यसमाधी आळंदीत अवघ्या विश्वासाठी पसायदान मागत एका माऊलीनं घेतली. तर दुसरीकडे तू अवघ्या दुरीतांचे तिमिर वारीत, विश्वाला स्वधर्माचा सूर्य दाखवित, किंबहूना सर्वसुखी करीत तू या पाचाडी समाधी घेतलीस.
जर दुर्गदुर्गेश्वर रायगड अवघ्या महाराष्ट्राची धर्मगंगा, शौर्यगंगा असेल तर पाचाड हे त्या गंगेचा ऊगम शतपुण्यतीर्थ गंगोत्री आहे. रायगडाची माती आपण भाळी लावतो. कारण आपल्या धन्याची पावलं त्यावर ऊमटलीत. पण साक्षात स्वराज्याचा धनीच इथली माती आपल्या भाळी लावित असेल... खरंच लोटांगण गं आई तुझ्यापुढे...
लेखन संतोष अंकुश सातपुते
फोटोप्रेमाभार मयूर खोपेकर
#raigad #rajgad
फोटोप्रेमाभार मयूर खोपेकर
#raigad #rajgad
तुमच्या लेखणीतून शिवकाळ किंवा त्या काळाशी संबंधित कोणताही लेख वाचताना तो त्या काळातच घेऊन जातो.
ReplyDeleteसुंदर...
ReplyDeleteदादा आपलं लिखाण नेहमी खूपच छान असत
ReplyDelete