राजगडास स्वर्गाची उपमा देणार नाही. कारण स्वर्ग किती जरी देखणा असला तरी राजगडाच्या दिमाखापुढे फिकाच. राजगडाचं सौंदर्य म्हणजे प्रुथ्वीमोलाचं अप्रुप. त्यात थोरल्या राजांचा त्यास लाभलेला जवळपास पंचवीस वरूषांचा सहवास. आता अधिक भाग्यवान कोणास म्हणावे. शिवरायांस ज्यांस असे दुर्गरत्न मिळाले की राजगडास ज्यांस छत्रपतींसम नररत्न.  असा हा दुर्गराज मिचमिचत्या डोळ्यांनी न्याहाळत झुंजार बुरूजाच्या ऊजवीस निघालो. द्वारातून खाली ऊतरता नजरेत भरते ऊगवतीकडे धावणारी सुवेळा नि दर्शन होतं शेजारच्याच तटबंदीच्या देवळीत विराजमान झालेल्या या तुंदीलतनू गणोबाचं.

किती दशकं लोटली, तपं ओलांडली, शतकं पार झाली असतील पण हा गणोबा मात्र या राजगडीच्या घुमटीत निवांत विराजला आहे. न राहवून त्यास विचारलच, बाबा गणोबा इथं वावरणारे सगळेच परागंदा झाले. तुम्ही का अजून इथेच आहात? तर मला म्हणाले, "अरे बाबा दिलेला शब्द पाळतोय"
"कसला शब्द नि कोणाला दिला होता शब्द" माझा आततायीपणा. मग सांगू लागला गणपतिबाप्पा त्याची कहाणी, "कैक वर्षे लोटली या गोष्टीस. पण असं वाटतय काल परवाचीच गोष्ट. या महाराष्ट्रमंडळी परचक्राचा फेरा आला. पिसाट गिधाडं देवदेशधर्मनारी दिसेल त्याचे लचके तोडत हिंडू लागली. भयाण भयाण अंधार मातलेला. नि या अंधारातच काहीतरी कुजबूज झाली. आता माझे कान सुपाएवढाले. म्हणून मला ऐकू आली. हा समोरचा तोरणा दिसतोय ना त्याच्या पायथ्याशी ही कुजबूज. अन् हा हा म्हणता यल्गार झाला. अल्ला हु अकबर च्या घोषणांची सवय असणाऱ्या कानांस नवीनच घोषणा ऐकू आली "हर हर महादेव" आणि पाहतोय तो एक नुकतच मिसरूड फुटू पाहणारा जहागिरदाराचा पोर नि सोबत लंगोटीवाली शिबंदी. या लवलवत्या ज्योती गच्च अंधारास धडका देत होत्या. ऊद्याच्या सूर्योदयास खेचून आणत होत्या.

शिवबाचं लक्ष्य या मुरूमदेवाच्या डोंगरावरी पडलं. नि या डोंगराचं भाग्य ऊजळलं. बारा मावळच्या राज्यावरी नव्या राजधानीचा मान मिळाला. भराभर कामं सुरू झाली.  या इवल्याशा शिवबाच्या मनात किती बरं योजना, कित्येक कामगिऱ्या, कैक मसलती. सगळच कसं अगदी जाणतेपणान, विचारपूर्वक नि द्रष्टेपणानं मांडलेला कारभार

राजगड राबता झाला नि एकेदिशी हा चिमुकला शिवबा त्याच्या सवंगड्यांसह माझ्यासमीप आला. नि म्हणाला, "बा गजानना. तू सर्व कार्यांस सिद्धीस नेणारा. या देवदेशधर्मकार्याचा मुळारंभ, आरंभ तूच.नव्यानं या स्वराज्याचा डाव मांडतोय. या स्वराज्यात तुझं मंगलमय वास्तव्य सदा राहो. आशिर्वाद दे. " मी ही सांगून टाकलं, "हे पहा पोरांनो, मी त्यांनाच मदत करतो जे स्वतःस मदत करतात. मी इथे वास्तव्य करेल पण तुम्ही तुमच्या कर्तव्यात कुचराई करू नका. आशिर्वाद, वरदान, नवस या असल्या भाकड गोष्टींवर अवलंबून राहण्यापरिस स्वतःच्या कर्तव्यावर, पराक्रमावर विश्वास ठेवा. खरोखरी त्यांनी हे पाळलं. स्वतच्या मनगटाच्या जोरावर हे बुलंद स्वराज्य ऊभारलं. स्वराज्याच्या या अग्निकुंडात स्वसौख्याच्या समिधा जाळल्या. माझ्या पूजेत दंग होण्याऐवजी ती आपल्या कर्तव्यात मग्न झाली. त्यांचं ध्येय हीच त्यांची पूजा. स्वपराक्रमावर त्यांनी या गडकोटांच्या देव्हारी स्वातंत्र्यदेवतेची स्थापना केली. हाडामांसाची माणसं असूनदेखिल देवांनाही लाजवेल असा पराक्रम त्यांनी केला. दिल्या शब्दास जागली. मग ती तर बोलून चालून देव. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. मग मलाही माझा शब्द पाळणं भागच आहे. म्हणून तर या राजगडी ठाण मांडलय. नि सदैव इथच राहणार. शिवबानं निर्मिलेल्या गडकोटांच्या स्वराज्यात... या दुर्गराजाच्या देव्हाऱ्यात... "



लेखन संतोष अंकुश सातपुते
फोटो प्रेमाभार मयूरदादा खोपेकर

Comments

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १