गड रायरीचा रहीवासी मी





गड रायरीचा रहिवासी मी
काठीवरती सूर्य तोलतो
अचाट वारा पिऊनी इथला
छातीवरी आभाळ झेलतो......

तटबुरूजांवर फिरता याच्या
गस्त, पहारा घालित जातो
स्वराज्यदेवा जागविण्या मी
गगनभेदी ललकाऱ्या देतो......

गंगासागरी गंगौघाच्या
पाण्यावरी मी होतो लाटा
कोंडेखळीच्या गचपणातील मी
चक्रव्यूवाच्या फसव्या वाटा....

टकमकीवरी सांजप्रहरी
मुक्त रंगाची धूळवड मी
ऊत्ताल कडा तो बुरूजभवानी
अतिप्रचंड अवघड मी....

वाघद्वाराच्या पाणलोटीचा
बेभान जलप्रपात कोसळता
राऊळी त्या जगदीश्वराच्या
शिवमहीम्न मी दरवळता....

सिंहासन चौथरीवरी त्या
प्रचंड ललकारी, गारद मी
महाद्वाराच्या चंड बुरूजांतील
अखंड जागल सावध मी....

होऊन धुक्याची गच्च घोंगडी
कधी रायगडा मिठीत घेतो
धुमधूमत्या जलधारा होऊनी
रायगडा कधी न्हाऊ घालतो....

भराट वारा पिऊनी इथला
असीम मी आकाश होतो
नगारखान्यासमोर मी
जरीपटक्यासम फडकत राहतो....

होत गहीरा अबोल काळोख
शिवसमाधीतळी दाटून येतो
गहीवर फुटूनी अश्रू सांडता
शिवराया मज कवेत घेतो....

मी संतोष... मी रायगडीचा हुजऱ्या...

लेखन- संतोष अंकुश सातपुते


Comments

  1. कविवर्य खासच...😘

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १