वाळसुऱ्याची खिंड गाठेपर्यंत चांगलच अंधारलेलं. अंधारातच खिंड चढू लागलो. दिवस ज्येष्ठाचे. म्हणजे रायगड पट्ट्यात तर ढगलोटीचे नि पाऊसफुटीचे. ठरवलेलं पावसानं गाठण्याआधी गड गाठायचा. त्याच बेगीनं पावलं ऊचलत होतो. अंधारी बुडालेला समोरचा हिरकणीकडा अंगावर येत होता.

पायठण्या चढून महाद्वारापास आलो. अन् हबकलो. दिक्क ऊत्ताल चिऱ्यांच्या गगनठाव बुरूजभिंती. त्याचं ते भारदार सौष्ठव! नागमोडी वळसा घेत ऊजव्या बाजूस वळलेली. या बांधणीत नुसता भारदस्तापणा नाही तर पिळदारपणाही. पुढे अधिक गच्च अंधार. आणि या अंधारभरल्या विहीरीच्या बेचक्यात मी अंगठ्याएवढा माणूस. असल्या मरणकाळ्या रात्री या महाद्वाराच्या काळोखात पाऊल टाकायची हिंमत होईना. क्षणभर वाटलं असच माघारी फिरावं. या महाद्वाराच्या काळखिंडीतून बाहेर पडावं. पण क्षणभर. मग निश्चय केला. नि नेटानं त्या बेचक्यातच थांबलो.

थोडं स्थिर झाल्यावर चळणारं मन एकाठायी झालं. हे महाद्वार
पाऊल वर्तमानात टाकत असलो तरी पावलांमागं भूतकाळाचा फुफाटा ऊडत होता. कसं घेतलं असेल या आडदांड महाद्वाराचं मोजमाप. कसा ओळंबा लावला असेल या भिंतींना. कसा आखला असेल याचा आराखडा. कुठे असतील ते नकाशे? कशी रोवली असेल याची भव्य चौकट. ही चौकट बसवताना इथं महाराजांनी नारळ वाढविला असेल. सोयराबाईसाहेब, पुतळाबाईसाहेब व इतर सवाष्णींनी या ऊंबरठ्यावर हळदकुंकू वाहीलं असेल. हिरोजींनी सर्वांचीच तोंडे गूळखोबरं देऊन गोड केली असेल. गवंडी, सुतार, पाथरवट, बेलदार साऱ्यांचाच घाम इथं सांडला असेल. कित्येक मोहिमा फत्ते करून परतताना मावळ्यांच्या जखमातून इथं आसूद सांडलं असेल. अशाच इमानी घामा-रक्तानं सांधलेले हे महाद्वार. अन् सज्ज झालं असेल रक्षणास.

किती किती बिनीचे शिलेदार इथून चढले, ऊतरले असतील. त्याकाळी कितीतरी शिबंदीचा इथं कराल पहारा. भाले, पलिदे, मशाली घेऊन ते स्वराज्याचे पाईक इथं इमाने इतबारे धन्याची चाकरी करीत असतील. भर पावसात भिजत. झणाणत्या चावऱ्या थंडीत शेकोटी पेटवून रातभर चालणाऱ्या त्यांच्या गप्पांचे साक्षीदार आहे हे महाद्वार. राज्यभिषेकासाठी तर अवघं स्वराज्यच धुऊन रायगडी आलं असेल. याच द्वारानं गागाभट्ट आले असतील. शिवरायांचे भूषण गात गात कवी भूषण आला असेल. छत्रपतींसी नजराणा घेऊन नारायण शेणव्यासह ऑक्झेंडन आला असेल. आपल्या मुलाचा अखंड पुरूषार्थ पहावयास राजमाता जिजाऊ पाचाडातून पालखीतून आल्या असतील. बारा मावळचे देशमुख, देशपांडे, वतनदार, जहागिरदा, साळी, माळी, कुणबी, महार, मांग, धनगर, बलुतेदार, अलुतेदार. अवघे या द्वारानं पावते झाले असतील.

आणि.. आणि ते निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवराय. कित्येकवेळा याच द्वारातून बाहेर पडले असतील. मोहीमेवर जाणाऱ्या राजांस याच महाद्वारानं शुभास्तू पंथान वदले असेल. हे महाद्वार त्यांच्या परतीच्या वाटेकडे टक लाऊन बसले असेल. राजे गडावर परतत आहेत हे सगळ्यात आधी यानेच अवघ्या गडास सांगितले असेल. बाळासाठी व्याकूळणारी हिरकणी गवळण इथूनच माघारी वळली असेल. पहाऱ्यावरील रखवालदारांस तिनं हात जोडजोडून विनंत्या केल्या असतील, त्या पहारेकरांचेही मन पाघळले असेल. त्यांनाही पोरबाळं असतीलच की. पण स्वराज्याच्या नियमापुढं दुसरं तिसरं काही महत्वाचं नाही. कुणीच मोठं नाही. नियम हे पाळण्यासाठीच असतात. आणि ते सरसकट सगळ्यांनीच पाळायचे असतात. असा होता स्वराज्याचा कारभार. जो नियम प्रजेला तोच दस्तूरखुद्द राजालाही.

१८१८ मे महिन्याच्या एका दुपारी प्रॉथरसोबत तह करण्यासाठी रायगडाचा किल्लेदार शेख अबू भरल्या डोळ्यांनी नि जड पावलांनी याच महाद्वारातून ऊतरला असेल. या महाद्वाराच्या चिऱ्याचिऱ्यांवर त्याने पुन्हा पुन्हा हात फिरवले असतील. त्यानंतर चढली असतील ती लाल माकडं. टापटाप बुटाचा आवाज करीत. स्वताच्या विजयाची गाणी वाजवित. या नीच स्पर्शानं या महाद्वाराचही अंग शहारलं असेल. आणि इथूनच पाय ऊतार झाल्या असेल ती मराठ्यांची स्वातंत्र्यलक्ष्मी वाराणसीबाई.भरल्या डोळ्यांनी त्या गडऊतार होताना या महाद्वारांच्या चिऱ्यांच्या काळजातही पाणीपाणी झालं असेल. आजवर ज्या रायगडास प्राणपणे जपला, थोरल्या स्वामींची तख्ताची जागा म्हणून पुजियेला तो रायगड असा कसायांच्या हवाली करताना किती हळहळल्या असतील त्या. आणि किती हळहळले असेल हे महाद्वार. अशीच स्थिती असेल जेव्हा बंदी अवस्थेत बाहेर पडल्या असतील श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसुबाई. बाल शिवबाराजांना (नंतर औरंगजेबाने त्यांचे नाव शाहू ठेवले) घेऊन. त्यांंनी तर लहानग्या वयातच नववधू म्हणून या महाद्वारावरील माप ओलांडलं असेल.

राज्यभिषेकानंतर रायगड ऊतरलेल्या जिजाऊ पुन्हा परतल्याच नाही. त्यांची वाट पाहत हे महाद्वार अजूनही ऊभे आहे. शिवछत्रपती वर जगदीश्वरासमोर निजले आहेत. ते केव्हाही मोहीमेवर निघतील त्यांना औक्षण करण्यास ते कायमच तत्पर आहे. त्यांची वाट पाहत ते आजही तितक्याच निष्ठेनं तिथे ऊभे आहे. छत्रपतींच्या स्वराज्यातील अखंड सावधपण हे या महाद्वाराच्याही चिऱ्याचिऱ्यात भिनले आहे.

का कुणास ठाऊक ऊगाच वाटू लागलं डोक्यावर फेटा, पायात पायताण, हाती एखांदं शस्त्र अशा अवतारात मी नि माझे बापदादेही या महाद्वारातून कितीदा आले गेले असतील.मग मात्र या महाद्वाराचा परकेपणा मावळला. तिथेच खाली बसलो. त्या थोरल्या उंबरठ्यावर हात फिरवित. तिथेच डोकं ठेऊन. काय सापडणार होते कुणास ठाऊक. पण वाटत होतं इथेच कुठेतरी माझ्या राजाने पाऊल ठेवलं असेल. इथेच कुठेतरी माय जिजाईच्या व्रुद्ध नाजूक पावलांचा स्पर्श झाला असेल. बराच वेळ दोन्ही हात या ऊंबरठ्यावरून फिरत होते. या महाद्वारास वाहायला मज दुबळ्याकडे काय असणार. पण क्रुतज्ञतेची चार दोन आसवं सांडली. ती त्याने गोड मानली असावी....

लेखन, फोटो- संतोष अंकुश सातपुते




Comments

  1. Apratim lekh Bhava.... Sarv ghatna dolyasamor ubhya rahtat, dole bharun ale vachtana.... Khoopach bhari...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुशीलभाऊ.....जे मी पाहतो तेच शब्दांतून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो...

      Delete
  2. खूप अप्रतिम दादा. 👌👌👌तुमच्या शब्दातून इतिहास जगल्याची अनुभूती आली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १