सह्याद्री... सोनकी... आणि मी...


ऐन श्रावण भाद्रपदातील सह्याद्री न्याहाळण्याची तुलना जगी एकाच गोष्टीशी. ऐन श्रावण भाद्रपदातील सह्याद्रीशीच. कारण त्यास जगी अन्य ऊपमा निदान माझ्यालेखी तरी नाहीच. वैशाखाचा वणवा चहूकडून धडाडलेला. पळस, पांगारा, काटेसावरीच्या तांबड्या फुलांनी तर जणू सबंध डोंगरास वणव्याची धार लागल्यासम. भुई गरम ऊसासे टाकीत असते. रानात आडवाटेस वाऱ्याच्या वावधुळी ऊठत असतात. स्वतःभोवती गरागर गिरक्या घेत रानभर गदळ ऊडवित असतात. अवघ्या कातळकड्यांवर पिवळट, पांढुरकं गवत भुरभुरत असतं. जणू म्हाताऱ्याच्या रापलेल्या कातडीवरील पांढरे केस.
अचानक एकादिवशी तापलेल्या जमिनीतून मिरगाच्या किड्यांची लगीनघाई सुरू होते. काळसर मातीतून तांबडेलाल रोहिणीचे किडे तुरूतुरू चौदिशी धाव घेतात. अन् काळ्या ढगांचे पाव्हणेरावळे मावळतीहून घाटमाथ्यास जत्रेला निघावं त्या बेगीनं निघतात.
नव्या नवरीवानी लाचत लाजत ज्येष्ठ या पश्चिमघाटाचं माप ओलांडतो. अन् चहुकडे तांदूळ सांडावे त्यारितीनं ढग सांडू लागतात. तापल्या तव्यावर गार पाण्याचा शिपकारा बसताच चर्र वाजतं, तसाच आवाज या तापल्या कातळातून घुमतो.
ज्येष्ठाची नवलाई सरते नि झांझरतो आषाढाचा धसमुसळेपणा. अशी मुसळधार बरसते या आडरहाळात की कधी कधी मनी दचका भरतो. या पाऊसझडीनं वैतागून हे बंबाळे डोंगरही जागचे ऊठतील नि आसरा शोधत फिरतील. पण ही आपल्या शुद्र मनाची कल्पना. सह्याद्री मात्र या सहस्त्र जलकुंभाच्या धारा आपल्या मस्तकावरून ओळवित असतो. आपादमस्तक सच्छैलस्नान. सगळे म्हणतात या सह्याद्रीत पाऊस अधिक. मला वाटतं या पावसालाच सह्याद्रीचा अधिक लोभ असावा. हा एवढा युगायुगांचा हटयोगी सह्याद्री त्याचे मुखप्रक्षालन, पदप्रक्षालन करण्याची संधी तो कसा जाऊ देईल.
अश्विनात तर सह्याद्रीचं रूप अधिक बहरतं. त्याचा रांगडेपणा मावळतो. दिसतो तो सकवार, बाळसेदार सह्याद्री. हिरवाईच्या गर्दीतून डोकावणारी शतकोटी रानफुलं. कुठं ढंगाळ्या पानावरील भुई आमरी, तर कुठे लालसर, जांभळा तेरडा, कुठे रानहळदीची कणसं तर कुठे सीतेची आसवं, कुठं जांभळट शिंदळकी तर कुठं दिठीभूल पाडणारी सोनकी. कितीतरी अशी ज्यांची नावच ठावकी नाही. पण रूप असं की इंद्राघरच्या वारांगणा फिक्या पडाव्या. या देवाघरच्या बुट्टेदार कलाकुसरीचे गालिचे मैल न मैल या सह्याद्रीवर अंथरलेले.
पिवळ्या धम्मक सोनकीचं रान बघितलं की जीव ओथवाळून टाकावासा वाटतो त्यावरून.  टिचभर सोनकीच्या सड्यानी अवघ्या सह्यमंडळास गवसणी घालते. जणू आभाळातून कुणी पोती भरभरून भंडारा ओतलाय. नि अवघा सह्याद्री या भंडाऱ्यानं माखलाय असा साजिरा. अवघं सह्याद्रीमंडळ जणू सोन्याची जेजुरी. हे प्रुथ्वीमोलाचं अप्रूप साठवाया दिठी दुबळी पडते. या रानभुलीत असे हरवाल कि खऱ्या अर्थानं स्वतःस सापडाल.
अशावेळी खरतर एकच सुचतं. भले मरण कुठेही येवो. माझी ही दुबळी कुडी या सह्याद्रीतच जाळा. तिची ओंजळभर राख द्या ऊधळून या भर्राट वाऱ्यावर. जी विखरेल चहूदिशांस. त्या राखेचा थर अलगद या मातीवर ऊतरेल. तिच्याशी एकजीव होईल. ज्या धरीत्रीनं हा देह दिला तिचा तिला परत केला. पाऊस पडताच पुन्हा ऊगवून येईल त्याच मातीतून. या चिमखड्या सोनकीच्या रूपानं. कळाशीदार पाकळ्या ऊमलतील पुन्हा. नि मान वर करून टुकटुकत बघत बसेल हा जगड्व्याळ सह्याद्रीचा पसारा. मिचमिचत्या डोळ्यांनी. न्याहाळेल त्या अरूपाचं रूप प्रत्येक पाकळीनं. अगदी पार कोमेजून जाईपर्यंत. नि कोमजल्यानंतर पुन्हा ऊगवेपर्यंत.

सह्याद्री फक्त मनात साठविण्याची गोष्ट नव्हे. कारण साठवलेल्या वस्तूंवर कधीकाळी जळमटं चढतात. हा सह्याद्री तर नुस्ता धडधडत वाहतोय या नसानसातून. मनातून मेंदुकडे नि मेंदुतून मनाकडे. बहुधा मी जिवंत आहे म्हणून तर तो या नसातून वाहतोय किंवा तो या नसानसांतून वाहतोय म्हणूनच तर मी जिवंत आहे...

मी सह्याद्री रांगडा
सुभग दरवळता केवडा
सोवळा सोनकीचा मी सडा
तरीही मी कोणीच नाही...

लेखन- संतोष अंकुश सातपुते
फोटो- श्रीकांतदादा शिंपी


Comments

  1. सुंदर.. समोरूनच सह्याद्री पहातोय असं वाटतं..

    ReplyDelete
  2. BetRivers Casino & Hotel - Jackson - Jackson County - KFOX 7
    BetRivers Casino 전라남도 출장마사지 & Hotel in Jackson County - Find out 안성 출장마사지 more about our casino, hotel, 태백 출장마사지 restaurants, gaming, entertainment, 구미 출장마사지 travel 논산 출장마사지 and more.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १