शिवकाळातील एका श्रावणातील सोमवारी...


शिवशंकर हे तसं वैरागी, विजनवासी दैवत. पर्वतात, गिरीकुहरात रमणारं. त्याच्या मनाजोगती अवघड, बिकटस्थाने या सह्याद्रीच्या अंगोपांगी अगणित. कुठे तो खंडोबा म्हणून विराजित झाला. तर कुठे ज्योतिबा म्हणून आसनस्थ झाला. कुठे घ्रुष्णेश्वर म्हणून तर कुठे त्र्यंबकेश्वर, कुठे सागरेश्वर तर कुठे लिंगेश्वर. कुठं वितंडेश्वर तर कुठे लवथळेश्वर, कुठे गावपंचक्रोशीत भैरवनाथ म्हणून तर कुठे अगदी निसंग मसाणजोगी होऊन ढाकच्या गडदेत बहिरी म्हणून.... तसाच इथं रायगडी जगदीश्वर होऊन तो विसावला.

श्रावणातल्या सोमवारी तर आदल्या दिवसापासूनच जगदीश्वराच्या सरबराईस सुरूवात होत असल. घरोघरीच्या घरधनीनी, चिमखड्या परकरी पोरी आपल्या अंगणा परसातील झेंडू, शेवंती, लालभडक जास्वंदी नानापरीची फुलं जमवित असतील. परकराचे ओचे धरून भरभरून बेल निर्गुडीच्या पाल्यासाठी अवघा गड पालथा घालीत असतील. रायगडावर निर्गुडीची काय वाणवा. सबंध गडभर निर्गुडी उभ्या. त्यातल्या त्यात बाजारपेठेमागून टकमकीकडे जाणाऱ्या वाटेवर, कुशावर्तापासून जो ओहोळ उतरतो तिथल्या खळग्यात, जगदीश्वरापाशी सातविनीच्या खळग्यात नि शिबंदीच्या घरटाणाशी अधिक दाट नि डंगाळ्या निर्गुडी.  पानही निमुळत्या चणीची. बेलपानांसारखीच. म्हणून जगदीश्वरास बेलपानांसोबत निर्गुडीचाही अभिषेक. गडभर पसरलेली पानफुले या पोरी आपल्या ओच्यातून आणीत जगदीश्वराच्या अंगणात ओतत असतील.

सोमवारच्या आदल्या रात्रीच, अहाहा.... किती बरं या नाना पानाफुलांच्या राशी. केवढाले डोंगर पानाफुलांचे जगदीश्वराच्या अंगणी. मंदीर घमघमतय नुस्त त्या नानाविध फुलांच्या परिमळानं. अवघा सुगंध दरवळतोय चौबाजूस. छाती भरभरून श्वास घ्यावा एवढा गोमटा सुगंध. आणि मंदीरच का? सगळा रायगडच घमघमतोय या सुगंधानं. पश्चिमेचा वाहता वारा तो परिमळाचा निरोप पोहोचवतोय अवघ्या घाटमाथ्यास.

रात्रीची जेवणखाणं उरकली असतील. अन् अवघ्यांनी धाव घेतली असेल जगदीश्वर मंदिराकडे. आज मंदीर दिक्क सजवायचं. पानाफुलांची तोरणे, सडारांगोळ्या, अगदी घासून पुसून लख्ख. उंद्या श्रावणी सोमवार. त्यासाठी हे आदबनं.

अन सुरू झाली बायकाची लगबग. भलेभले दोऱ्याचे गुंडे, मोठमोठाल्या दाभणी एवढाल्या सुया आणल्या जात असतील. लहानग्या पोरीही सुईदोऱ्याचा हट्ट करत आहेत. त्यांस त्या दटावतायेत. मग त्या छबुकड्यांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांसही लहान सुई दोरे दिले जात असतील. तोवर इकडे एकएकीचे हात दोऱ्यांत सुया ओवून फुलांची हार, तोरणे तयार करण्यास सज्ज होत असतील. असे सरावलेले हात ते. त्यांचे धनी जशी रणात तलवार गरगरा फिरवतात, मग त्यांची बाईल तरी मागं कशी. तिचेही हात फुलं ओवताना झरझर धावतायेत. एकामागं एक तोरणे, माळा यांच्या लांब सरी ओवल्या जात आहेत. त्यात कोणी आंब्याची पानं दुमडून ओवत आहे. कोण चार चार फुलांचे गोंडे विणून लांब माळेत जागोजागी गुंफत आहे.

अगदी खाशा राणीसरकारांपासून, कुळवंत घरच्या लक्षुमी, दासदासी सगळ्याच एकत्र बसल्या असतील. देवाच्या दारी कोण दासी नि कोण मालकीन? सगळ्याच फुलांच्या ढीगाभोवती जमल्यात अन् सराईतासारख्या हार, माळा, तोरणे, गजरे, वेण्या गुंफत आहेत. हसण्या खिदळण्यात आकाशीचा चांदवा मावळतीस सरकत असेल. पण बायकांच्याच गप्पा त्या मारूतीच्या शेपटीसारख्या. त्यांच्या कल्लोळानं तर बिचाऱ्या जगदिश्वराचीही समाधी भंगली पहा. पण तो तरी काय करणार बिचारा? सगळ्याच माहेरवाशिनी बापाच्या अंगणात बसल्या आहेत. त्यांना कुणाची भिती? तो भोळासांब तरी आपल्या या लाडक्या लेकींना कसा बरं दटावेल. शेवटी बापाचच मन ते. अन् मध्येच हार गुंफता रातीच्या त्या नीरव शांततेत श्वासासोबत शब्द फेकीत असेल...
"अंगणी वाढविली, निगुतीनं तुळइस
ऊंगवतीला पुजे, जगदीसुराचा कळइस"

तिच्या या शब्दसरीनं सगळ्याच गडणिंच्या प्रतिभा मोहरत असतील. कंठांना शब्दाची पालवी धुमारत असेल. सहजतेनं श्वास बाहेर पडावा तितक्याच अलवारपणे ओव्यांचे अम्रुत झरू लागले. अवघा रायगड मशालीच्या लवलवत्या ऊजेडात सर्वांगाचे कान करून ते कवतिक ऐकतोय

आणि हा हा म्हणता दुसरी, तिच्यासोबत तिसरी सर्वच या शब्दांच्या सारीपाटात प्रतिभेचे दान टाकताना म्हणत असेल

"माझ्या कपाळी कुकवाला, न्हाई कणभर धक्का
लई पुण्यानं मिळाला, शिवबा बंधू पाठीराखा"

सुवर्णसिंहासनी बसलेल्या शिवरायांस आठवत एक म्हणते

"भरल्या राजसभेत, शिवबा कसा दिसयतो
मोगऱ्याच्या दुरडीत, सोनचाफा शोभयतो

काळ्या चंद्रकळी, जडीलं सोनियाचं मोरं
शिवबा माझा गं सूरव्य, सोयरा चंदराची कोर"

एखादी जुनीजाणती, शहाणीसुरती म्हातारी. ती तरी कशी माघार घेईल. ती ही कुणाची तरी लेकच आहे ना. मुलगी कितीही म्हातारी झाली तरी माहेराच्या अंगणाला ती परकरी पोरंच. तिलाही तिच्या माहेराची आठव येत असेल...

"कोरीगडाच्या कुशीत, गाव नानिवली बाई
माझं माहेर खुशाल, ठेवी आई कमळजाईन"

या सगळ्या गोतावळ्यात जर एखाद्या आईची लेक माहेरपणास धाडली नसेल तर तिच्या काळजाची सल ती सांगत असेल...

"लेकीचा जलम, नको जगदिसुरा
मोठी कठीण चाकरी, परक्याच्या दारा

लेकीचा जलम,  कुणी घातला येड्यानं
परक्याच्या घरी, बैल राबतो भाड्यानं..."

मघासच हासणारं वातावरण आता थोडकं गंभीर झालं असेल. मग इतरजणी तिची समजूत घालीत असतील.  मघासची म्हातारी बाकीच्यांस दटावित असेल,

"नाही कामाला गं जोरं, ऊगा तोंडयाचा वारा
द्या हाताला गं वेग, हार गुंफा भराभरा..."

इकडं बायकांचा हा कल्लोळ तर तिकडे पुरूष भराभर माळा, तोरणे मंदिराच्या चौबाजूस लावित असतील. कोणी भवतालच्या आवारास केळीचे खांब, आंब्याचं टहाळे बांधित असेल. कोणी नंदीस फुलांचा भला हार घालीत असेल. कोणी त्याच्या पायी मोगऱ्याच्या घागऱ्या बांधित असेल. व्वा! काय सकवार शोभतोय नंदी



पहाट ऊजाडली. अवघा गड कसा हिरवागच्च दाटलेला.  पुर्वदिशी राजगडामागून सूर्य वर येत असेल. धुक्याचा लोट अवघ्या गडभर हिंडतोय. जणू सह्याद्रीच्या धुपारतीचा धूर चहुबाजूंस दरवळतोय. जगदीश्वराच्या राऊळी सुरूवात होत असेल वेदोक्त मंत्रांना. महाराज, अवघा राजपरिवार, जिजाऊ, अवघे गडकरी सर्वच ध्यानस्त असतील. बाहेर धुमधुमू पाऊस पडत आहे. आत गाभारी शिवसांबाला अभिषेक घडत आहे तर बाहेर अवघ्या सह्यसांबास ही मेघुटे अभिषेक घालित आहेत...


लेखन व फोटो - संतोष अंकुश सातपुते



Comments

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १