उठले शिवराय समाधीतून...

सांज झाली. सूर्य पश्चिमेकडे झुकला. अन् ऊठले शिवराय समाधीतून. भवताली कोणीही नाही. अंगावरचा शेला सावरत पाहत असतील ऊगवतीस डोळे किलकिले करून. पाहत असतील राजगडास. न्याहाळत असतील कातळमुकूट ल्यालेला बालेकिल्ला. घटकाभर टेकले असतील हीरोजींच्या पायरीशी. मायेनं हात फिरवत असतील त्या अक्षरांवरुन, पाणावलेले डोळे पुसत म्हणत असतील "बाबांनो, तुम्ही पायरीचे दगड झालात म्हणून तर उभं राहीलं हे स्वराज्याचं मंदीर..."

गोंजारत असतील जगदीश्वरासमोरील तो ताटकळलेला नंदी. एवढा दगडाचा नंदी, पण शिवस्पर्शानं थरारतोय पहा कसा. जगदीश्वराचरणी नतमस्तक होताना मोतीयाचा तुरा आंदोळतोय. "एकेकाळी दिनरात पंचाम्रुतानं अभिषेकणाऱ्या मस्तकावर आज पाण्याची धार नसावी. बेलाफुलांनी गुदमरणाऱ्या त्यास आज निर्गुडीचं पानही नशिबी नाही." खिन्न मनानं बाहेर येत असतील. दारापाशी काढलेल्या मोजड्या चढवतील. अन् निरखतील समोरची वाट. आडवी पसरलेली बाजारपेठ. तो डाव्या हातास दिमाखदार नगारखाना. सगळच सूनं सूनं... एकेकाळी लोकांचा महापूर अनुभवलाय या वाटेनं. राज्याभिषेकाच्या मिरवणुकीस. वाटेवर जेवढे खडे नसतील तेवढा माणसांचा लोंढा. राजाभिषेकाचं कवतिक दिठीत साठवण्यास आलेली. आज ती वाट अगदी सुनी. ज्या वाटेनं झडाझड मुजरे झडायचे त्या वाटेनी विचारपूस करण्यासदेखिल आज कुणी नसावं. कुठं हरवली ती जीवाभावाची माणसं?

ओसाड अवस्थेत पडलेल्या वाड्याहुड्यातून जड पावलांनी हिंडत असतील महाराज. किती बरं निगुतीनं बांधवलेले हे वाडे. त्या पडक्या भिंतीवरून, चिऱ्यांवरून फिरतायेत ती राजस बोटे. वाड्यांच्या जखमांवर संजीवनीचा स्पर्श. बामणवाड्याच्या डावीकडनं दिसला पोटल्याचा डोंगर. महाराजांस पाहून त्यानं मान झुकविली असल, " अरे बाबा तुझा तरी काय दोष? जिथं जिवंत माणसांची ईमानं ढळली तिथं तुम्ही तरी काय करणार!"

बाजारपेठेतील सुन्या जोत्यापुढून येत असतील होळीच्या माळावर. वारा वाहतोय. त्यांचा शेला फडकतोय. सभोती कोणी नाही. ज्यांच्यासाठी जीवाची कुरवंडी केली त्यातलं कोणीच नसावं गडावर. इतकी कशी चुकार निपजली माणसं. कुठं गेली ती स्वराज्याच्या मातीसाठी जीवाचा बेलभंडारा ऊधळणारी माणसं. भराभर टकमकीवर येऊन खाली महादरवाज्याकडे पाहत असतील. कळकळीनं विचारत असतील.
"बाबा रे निदान आज तरी आली होती का माझी माणसं?"
ते महाद्वारही खाली मान घालून म्हणत असेल,
"राजं... मावळे म्हणून वागणारे ढीगभर आलेले... पण मावळे म्हणून जगणारे... एकपण नाय..."

तसेच खिन्न हताश होऊन राजे बसले असतील टकमकीवर, आवाज देत, " तान्हा... जीवा...शिवा...अरे अरे कुठे शोधू तुम्हाला? बाळपणीचे सवंगडी आपण. मला सोडून कुठे निघून गेलात. गुदमरतोय रे जीव..."
न्याहाळत असतील खिंडी पलिकडला जिजाऊंचा वाडा. भरल्या डोळ्यांनी हाकारत असेल "आऊसाहेब... आऊसाहेब"

बाजुची सह्यशिखरही मुसमुसतायेत. वारा बैचेन होऊन वाहतोय. गहीवरल्या सूर्यानं स्वतःस विजवून टाकलय. अवघा गड अंधारात बुडत आहे. सर्वत्र काळोख पसरत आहे. सर्व शांत. गडावर फक्त आवाज घुमतोय तो हुंदक्यांचा....

आणि रोजच्याप्रमाणं हा दिवसही असाच सरला...

निशब्द....


लेखन- संतोष अंकुश सातपुते
फोटो प्रेमाभार-  देवेंद्र कांबरे
एडीट - सुप्रसाद पुराणिक



Comments

  1. खूपच अप्रतिम लिखाण... Hats off 🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ....काय बोलावं मलाच सुचत नाही

      Delete
  2. धन्यवाद निशांत....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १