अगं ऊठ बाई...

अगं ऊठ गं बाई! ऊठ लवकर. एवढं काही झालं नाही आ तुला. जखमांचेच तर घाव ओरबाडलेत सबंध शरीरभर फक्त. रक्तबंबाळच तर झालय अवघं शरीर फक्त. मांसाची लक्तरच तर चिंधड्यांसारखी लोंबतायेत फक्त. आणि.... आणि बलात्कारच तर झालाय फक्त...

यात एवढं विशेष काय? आजकाल तर हा टाईमपासाचा विषय आहे. च्युईंगमसारखा एक दिवस चघळू नि रस संपला की टाकू थुंकून. बलात्कारासारख्या फालतू विषयाला यापेक्षा जास्त किती दिवस द्यायचे. हा ते जर एखाद्या राजकारण्याचं सर्दी पडशासारखं महत्वाचं असतं. किंवा सेलिब्रेटीच्या पोरांचं हगणं, मुतणं असतं तर ठिक. पण तुझ्या बलात्कारात इतकं काय इंट्रेस्ट किंवा ब्रेकिंग न्यूज नाही आम्हाला. वाटलं तर ते मेणबत्त्या वैगेरे पेटवू किंवा काळे डिपी, मोर्चे काढू. पण वाटलं तर हा. तू ही फार अपेक्षा न ठेवलेलीच बरी. या आभासी जगात वावरताना वेळच नाही गं आमच्याकडं या नग्न वास्तवाकडं पहायचा.

अगं ऊठली नाही तू! कुणाची वाट पाहतेय? आमची! अगं आमचा तर तुझ्या रक्तबंबाळ देहासोबत केव्हाच सेल्फी घेऊन झालाय्. कधी? मघाशीच. ते बेशुद्ध होती तेव्हाच. त्याला झक्कास कैप्शन लिहून टाकलाही मी स्टेटसला. भरपूर लाईक्स मिळतायेत. बघ तुझ्या मेकअप मधल्या लाजतानाच्या फोटोलाही एवढ्या मिळाल्या नसतील कधी. आणि कमेंटचा तर नुस्ता पाऊस. किती हळहळतायेत. फिलींग सैड स्माईली टाकतायेत. बघ तरी एकदा. ह्यै. तुला ना कसली एक्साईटमेंटच नाही. एवढं काही झालं नाही बरं का? अगं बलात्कारच तर झालाय. इतकं काय त्रासाचा इशू करायचा? बरं बलात्कार काय तुला नवा थोडाच. अगं तुझ्या जन्मापासून मरणापर्यंत तो होतच असतो. कधी वखवखलेल्या नजरेतून, कधी रानटी स्पर्शातून, कधी लोचट शब्दातून तर कधी काळीज फाडणाऱ्या हावभावातून. कधी शरीरावर. कधी मनावर.

खरं सांगू चूक तुझीच आहे.मुळात तुला परवानगीच कोणी दिली? या रानटी पशुंच्या कळपात माणूस म्हणून जन्माला यायची. आली तर आली, त्यात पुन्हा बाईमाणूस होऊन. अशी चूक सॉरी अक्षम्य अपराध तू का केलास? काय? तुला अजून अपेक्षा आहे न्यायाची! वेडी की काय तू? ते चौरंगा वैगेरे करण्याचे दिवस संपले कधीच. तेव्हा सिंहासनी साक्षात् छत्रपति होते. आता तर गादीवरच रांज्याचा पाटील नि रंगो त्रिमल ऐटीत बसलाय. तू त्यांच्याकडं दाद मागतेय. हे म्हणजे हैवान लांडग्यांनी तुझा लचका तोडला हे पिसाट गिधाडांना दाखवण्यासारखं. अगं तुझी भळभळणारी जखम पाहून या गिधांडाच्याच तोंडाला पाणी सुटलय...

आणि ऊठलीस कि कुठे जाणार? घरी, दारी, चौक, नाक्यावरी, गावी, शहरी, मशिद, मंदिरी सगळीकडच तर या टोळधाडी फिरतायेत. हा. तू आपली घोर जंगलात जा. काय? तुला रानटी पशुंची भिती वाटतीय. काळजी नको. तिथले सगळे रानटी पशू त्यांचा अघोरी पाशवीपणा घेऊन इथं वसलेत. जंगलात फक्त प्राणी आहेत. माणुसकीनं वागणारे नि वागवणारे. आता इथं स्वतंत्र पशूशाही आहे. इथं डावाला लावणारेही तुझेच. निरीला हात घालणारेही तुझेच नि अंधपणाचं सोंग घेऊन तुझं वस्त्रहरण मिटक्या मारत बघणारेही तुझेच. हो हे सगळे तुझेच तर आहे. तूच तर म्हणायचीस ना.... काय बरं ते वाक्य? ही असली निरर्थक वाक्य लक्ष्यातच राहत नाही. हं..हं.. हा, "सारे भारतीय माझे बांधव आहे."

तुझी तूच ऊठ बाई? खंबीर होऊन. पुन्हा लढायला. काय  म्हणालीस आमच्याकडून आधाराच्या खांद्याची गरज आहे. तुला ठाऊक नाही वाटतं. प्रेतं कधी जिवंत माणसाला खांदा देत नाहीत.

लेखन- (अ)संतोष......
फोटो- नेट साभार




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १