बहिर्जी नाईक... ईतिहासासही न ऊमजलेलं कोडं...

बहिर्जी. या माणसाविषयी सांगणं म्हणजे पाण्याचा रंग किंवा हवेचा आकार सांगण्या इतपत महाकर्मकठीण. अहो ज्या अवलीयानं ईतिहास नावाच्या सदैव चौकस असणाऱ्या पुरूषाच्या डोळ्यात धूळ फेकली तिथं तुम्हा आम्हा कर्मदरीद्रांच्या डोळ्यास कसा हो गवसायचा. फुलासंग बोलता बोलता त्यातला वास कधी चोरून नेईल नि सोन्याशी लगट करता करता त्याचा रंग कधी ऊडवील याचा नेम नाही असा अवलीया. बहिर्जी म्हणजे गुढता, न सुटलेलं कोडं,
हाती न गवसणारं म्रुगजळ. बुद्धीस न पटणारा तर्क. बहिर्जी म्हणजे अवसेची जख्ख काळोखी रात्र. जिच्या गर्भात दडला होता स्वराज्याचा ऊषःकाळ.

स्मरतय, रायगडी जाण्याचा पहीलाच योग. दिक्क रात्रीचा एकलाच गड चढत होतो. चौबाजूस ढगांचा दाटवा. त्यामूळं अंधार अधिकच गडदावलेला. महाद्वार ओलांडून पल्याड डाव्या हातास वळलो नि अंगावर चर्कन काटा आला. समोर टकमकीचा बंबाळ्या कडा. अंधारात घोंगडं घेऊन कोणीतरी दबा धरून बसल्यासारखा.क्षणभर वाटलं जर हा टकमकीचा कडा हटकून ऊभा राहीला तर....नि आठवला बहिर्जी.

स्वराज्यासाठी असाच कितीतरी रात्री रानावनातून हिंडणारा. काळोख पांघरूण दबा धरून बसणारा. आभाळ माथ्यावर घेत हिंडणारा. वारा होत चौफेर वावरणारा. सरड्या तेरड्यानही लाजावं इतक्या क्षणी रूप बदलणारा. जीभेवर बहूभाषांची बाजारपेठ वसवणारा. नि स्वराज्य, शिवरायांसाठी स्वताचा जीव सदैव ऊधळणारा बहिर्जी. स्वातंत्र्याची कुळवंत लक्षुमी स्वराज्याच्या ऊंबरठ्याआड नांदावी म्हणून लक्ष्मणरेषेप्रमाणे बाहेर चौकस पहारा देणारा...

शत्रुच्या गोटात नि पोटात शिरणं काय खायचं काम! भवताली यमकिंकरांचा कराल पहारा. पण त्यातुनही हा सहज फिरतोय. अगदी बत्तीस दातांत फिरणाऱ्या जीभेसारखाच. अभयता जणू यांच्या पाचव्यांनाच पुजलेली. भिती अशी नाहीच. हा पण सावधपणास मात्र तीळभर खंड नाही. किती मोठी जबाबदारी त्याच्यावर. त्याच्या बातमीवर तर शिवरायांची कामगिरी. बातमीतला एखादा चुकीचा शब्द, एखांदा फुटीर नि सगळच होत्याचं नव्हतं व्हायचं.

कधी कधी वाटतं या माणसांस घरदारं होती का नाही? बायकापोरांचा लळा होता का नाही? मायबापसाची गोतावळ्याची सय होती का नाही. गावशिवाराची ओढ सणासुदीचा मोह होता का नाही. मंग आठवलं एकदा का ध्येयाच्या भूतानं झपाटलं की सुखदुखाची कुठलीच मात्रा उपेगी पडत नाही. अहो जैसा राजा तैशी प्रजा. जिथं राजालाच स्वराज्याशिवाय अन्य सुखसोहळा ठावकी नव्हता तिथं इतरांचं काय?

माझा ठाम विश्वास की बहिर्जी आहेत. आजही. बळी, हनुमान, अश्वत्थामा या सप्तचिरंजीवात आठवा चिरंजीवी. अहो ज्यानं भल्याभल्यांस फशी पाडलं, ईतिहासास चकवा दिला त्यास म्रुत्यूला गुंगारा देणं कितीसं अवघड. या महाराष्ट्र रहाळात, या सह्याद्रीमंडळात एखाद्या अनगड वाटेवर, झाडाखाली तो अजूनही बसलाय. सावध हेरगिरी करीत. या धूळमाखल्या वाटेनी त्याची गाठ पडेलही. पण त्या मायावी बहुरूप्यास ओळखण्यास नजरही जाणती हवी. नि त्या नजरेत हवी शिवराय नि स्वराज्याप्रति गगनातूल्य निष्ठा. मी तर शोधतोयच त्यांस्नी पण जर ते तुम्हास भेटलेच तर माझा हा चार ओळींचा मुजरा नक्की रुजूवात करा त्यांच्या चरणी...


बहिर्जी नाईक, स्वराज्य पाईक, सदैव चौकस हेरगिरी
बोल बोलता, काळीज ऊचले, क्षणी आगळे रूप धरी
तया पावलांवरी चालता, शिवशाही सलामत पुन पुनः
इतिहासा ना अजुनी गवसल्या, परी तयांच्या पायखुणा

लेखन- संतोष अंकुश सातपुते
चित्रकारीता-  आनंद घोडके

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १