सेवेचि ठाई तत्पर, हिरोजी इंदळकर...

नतमस्तक या पायरीशी, जिचे इमान स्वराज्याशी


हिरोजी इंदळकर. काय असेल हा माणूस. रावणाची लंका घडवणाऱ्या विश्वकर्मानही हे रायगडीचं बांधकाम पाहून तोंडात बोटं घालावे. पांडवांची मयसभा बांधणाऱ्या मयासुरानेही आपली थापी, ओळंबा खाली टाकून या हिरोजीपुढं नतमस्तक व्हावं. असे हे हिरोजी.

कसे असतील रंगरूपानं? इतर मावळ्यांसारखेच. दणदणीत भारदस्त मूर्त, दोन्ही बाजूंनी कानाशी भिडलेल्या डेरेदार मिशा. तालेवारी फेटा. गरुडासारखी भरभर कामांवर फिरणारी सावध, गतिमान नजर. चिरा कसा घडवावा इथपासून जगदिश्वरी कळस कसा चढवावा इथवर. अवघ्यांवर जातीनं लक्ष्य.

रायगडी बांधकामाचा धडाका ऊठला असेल. चौबाजूस मोठमोठाल्या शीळा फोडल्या जात असतील. शे चारशे पाथरवटांचे घन, छन्नी, हातोडे चिरा, चिरा घडवण्यात गुंतलेले.
अवघ्यांची छाताडं लोहाराच्या भात्यासारखी धपापणारी. सबंध रायगडच त्यांच्या हुंकारानं, छन्नी घनांच्या घुंकारानं घुमत असल. या कामदारांच्या घामानी भिजत असल. स्वराज्याची राजधानी ऊभारताना सांडलेला घाम तो. समरभुमीत सांडलेल्या आसुदाइतकाच पवित्र. त्या घामापुढं गंगाजळाचं मोल ते काय!

हिरोजींच्या जीवास तीळभर उसंत नसेल. तणतण करीत, पायताण वाजवित, कधी चौखूर घोडा उधळीत तो सबंध गडावर वारा होऊन फिरत असेल. चाललेल्या सर्व कामावर त्याची जातीनं नजर. फुटणारे प्रत्येक शिलाखंड, घडणारा प्रत्येक चिरा, ऊडणारा हर एक टवका, रचणारी प्रत्येक वास्तू, त्यांची जोती, पायऱ्या, ओवऱ्या, कळस, कमानी, रस्ते, देवळापासून देवळीपर्यंत, राजसभेपासून शिबंदीच्या घरटाण्यापर्यंत, टिचभर टाक्यांपासून महातलावापर्यंत, शौचकुपापासून खडकातील चरापर्यंत, नकासदार स्तंभापासून अजस्त्र नगारखान्यापर्यंत, चोर दिंडीपासून महाद्वारापर्यंत आणि हिरकणीबुरूजापासून भवानी बुरूजापर्यंत यत्र, तत्र, सर्वत्र हिरोजी, हिरोजी नि केवळ हिरोजीच...

रायगड! राजधानीचा गड बांधायचा. साधी कामगिरी थोडीच ती. हे राजाचं काम. म्हंजी परतक्ष धरमाचं काम. ते काही करून बैजवार पार पडलच पाहीजे. शिवाय हे काम मिळण्यास हिरोजीनं वशिला लावलेला. हा वशिला होता त्यांच्या अपार अपार मेहनतीचा नि स्वराज्याप्रति असलेल्या आभाळभर निष्ठेचा.

हळूहळू ऊगवतीचा सूर्य वर चढावा नि जगाचे डोळे दिपावे, तसच हे बांधकाम. पूर्णत्वास भिडताच अवघ्यांचे डोळे दिपले असतील. या दुर्गम, दुर्घट दुर्गदुर्गेश्वरास पाहताच स्वराज्यातील मायमावल्यांच्या प्रतिभा मोहोरल्या असतील. श्वासांना शब्द फुटले असतील. भल्या पहाटे जात्यावर दळताना त्या अभिमानानं म्हणत असतील

आंगर डोंगर फोडूनी, चिराचिरा घडयेला
शिवबाच्या किरतीचा, कळस गगनी चढयीला

अगं रावणाच्या लंके, तुझा तोरा कर खाली
तुझ्यापरास राजधानी, हिरोजीनी बांधयीली...


लेखन- संतोष अंकुश सातपुते
फोटो प्रेमाभार- अमोलदादा तळेकर



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १