दुर्गराज ते दुर्गेश्वरः बेक्कार ऊन...चिक्कार पायपीट... मोक्कार सुख...

बाबा गडावर जाया वाट ?
हे काय! हे हितून म्होरं गेल्याव, त्या घराच्या मेरंनं वर येंगा.
म्होरं गेलं कि डाव्या हातानं वळून सरळ वर. मळल्याली वाट नगा सोडू.
बरं!

आज्यानं सांगितलेल्या वाटंवरून आम्ही मार्च महिन्याच्या अकरा-साडे अकराच्या टळटळत्या सूर्यास साक्षीस ठेऊन चोरदिंडीच्या वाटेस पाय टाकला. जवळपास दहाबारा वर्षापुर्वी आलेलो. सोबत जाणकार मित्र होता. आता मात्र मी अन् सोबतीला आपला फौजी केतन पवार. त्यानं आधी राजगड पाहीला नव्हता. आणि मी पाहून ऊपेगाचा नव्हता. नाही म्हणाया बुडत्याला काडीचा आधार.

भर दुपारचच वाटेचा फुफाटा ऊडवत, कळाकळा तापलेल्या कातळांवरून, भुरभुरणाऱ्या मुरमाडीवरून आम्ही पाठीवर ओझी आवरत निघालो. सूर्य ओकतो अनलज्वाळा ही एसीमध्ये बसून वाचलेली ओळ. तिचा पुरेपूर अनुभव घेत होतो. त्यातल्या त्यात आधार भवतालच्या थोड्या बहूत सावलीचा. पण वाऱ्यानं मात्र पार तोंड काळं केलेलं.

पठारावरून राजगडाच्या मुख्य चढणीस लागलो. गडावर राजाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होता. त्याच्या ढोल ताशाचा आवाज अवघा राजगड घेऱ्यात घुमत होता. चोरदिंडीची वाट इथून नेमकी दिसते. बाजूचं रान अवघं करपलेलं व ऊरलेलं पानगळीमुळं झडलेलं. पद्मावतीच्या तळाशी कड्यापाशी वाट ऊजवीकडं वळते. तिथं कड्याची थोडकी सावली. बरेच मुक्काम घेत आलेलो तेव्हा ठरवलं आता थांबायचं ते पद्मावतीच्या राऊळातच. पण आमची हीच शपत मोडायला बहुतेक एक दादा चोरदिंडीच्या चढणीच्या अलिकडं ताक, लिंबूपाणी वोपाया बसलेले.

टेकाया कारणच भेटलं. वाट वाकडी करून त्यांच्याम्होरं हाजिर झालो. दोन दोन लिंबूसरबतं पोटात रिचवली. आतड्यांना अजून जिवंत असल्याची जाणीव झाली. मंग सुरू झाल्या गप्पा. आधीच स्वभाव बोलघेवड्या साळुंकीचा. त्यात अशी गावरान माणसं भेटली की फड चांगलाच रमतो. त्यांचं नावगाव ऊकललं. सुभाष जाधव. गडाच्या पायथ्याशी पाली गावचे. रोज एवढा गाडग्या लोटक्यांचा संसार डोक्यावर वागवत या तापल्या वाटांनी इथवर यायचं. गिर्हाईक झालं तर बरं. नायतर मिठ मिरचीचेसुध्दा पैसे सुटत नाही. लिंबूसरबत संपवून आमची गाडी ताकावर घसरली. तोंडाचं भांडं वाजतच होतं,
दादा ते खाली तळात घर कुणाचं हो?
ते व्हय माझ्या सासऱ्याचं. हनुवती फणसेचं!
काय....!मी तीनताड उडालो.
हनुवती फणसे. म्हणजे तुमच्या सासुच नाव येसुदी का? आणि तिच्या वडलांचं नाव बाबुदा भिकुले ना.
व्हय... 
आता तीनताड उडायची वेळ त्यांची होती.

आप्पांची वाघरू कादंबरी अनेकदा वाचलेली. त्यातल्या सगळ्या पात्रांसोबत मी राजगड मनोमन हिंडलेलो. बाबुदासोबत बसून पद्मावतीच्या राऊळात गप्पा मारल्यात. चुल्हीम्होरं शेकत वहिनींनी दिलेल्या भाकरी नि रानडुकराच्या मटनाचा फडशा पाडलाय. लहानग्या येसुदीसंगत गुरं चारायास कधी संजीवनीस तर कधी सुवेळास हिंडतोय्. बंदूक घेतलेल्या हनुवतीसंगत वाघरू टिपायला बालेकिल्ला येंगून जातोय्. त्यामुळं हे आवघं कुटूंब मला जवळचं. आप्रुकीचं. आजवर कल्पनेत भेटलेलं. त्याच परिवारातील हे दादा भेटले. केवढी अपूर्वाई. ऊन्हाचा कोळपा तिथच निवळला. चांगलं बाटलीभर ताक घेऊन निघालो.

चोरदिंडीतून वर मायथ्यावर आलो नि वातावरणानी कुस बदलली. म्हणजे ऊन तसच फक्त जोडीला वारा धावत होता. थंडगार, सुखावणारा स्पर्श. थकल्यामुळं जणु महाराज कुरवाळत आहेत असाच भास. आजुबाजूस न्याहाळलं. समोर आडदांड पसरलेला तोरणा. प्रचंडगड. तोरण्याच्या ऊजवीस सिंहगड. अन् ऊगवतीस ताठ छाती करून ऊभा ठाकलेला पुरंधर. सभोती पसरलेल्या डोंगरांच्या गर्दीतून जर गड ओळखता आला तर त्यासारखं दुसरं सुख नाही.  मावळतीस भिडलेली सह्याद्रीची रांग. अन् त्यातच गवसला जीवाचा जीवलग रायगड. फार फार दूर. अगदी तळहाताएवढा. शेजारी लिंगाण्याची शेंडी. मनी थोडं धस्स झाल. ऊद्या हे सगळं जगडव्याळ पार करून रायगडी जायचय.

तळ्याचा चढ चढून पद्मावतीमंदिराकडे चालते झालो. गडावर जयंतीनिमित्त बरीच गर्दी जमलेली. मघाचे ढोलवाले हाताची मनगटं ढिली पडेपर्यंत ढोल वाजवून जरा विसावले होते.

पद्मावतीचं दर्शन घेऊन सुवेळाकडं निघालो. दुपारचं जेवन नेढ्यात करायच ठरवलं. माची, सदर, अंबरखाना मागं टाकत आम्ही गुंजन दरवाज्याची तटभिंत ओलांडली. सुवेळाकडं न जाता डाव्या वाटनी. गुंजवणी दरवाजा पहायास ऊतरलो. वाट जरा मोडलेली. खाली तळात दरवाजा. भक्कम बांधणी. तसाच माघारी परतलो. पुन्हा सुवेळाच्या वाटेस लागलो. डुब्यापासून जाऊ लागलो. त्या तळाशी गच्चरान. सगळी वाट दाट सावलीतली. हिरवं, थंडगार सुख. दहा मिनटानी झाडीच्या बोगद्यातून मोकळवनात आलो. वाट झुंजार बुरजाकडे धावलेली. आसपास वाळलेल्या गवतात कितीतरी वाड्याहीड्यांचे अवशेष. मनास डाचत होते. एकेकाळी भल्या भल्या समरधुरंधरांना आश्रयदाते झालेले हे वाडे आज अगतिक, केविलवाणे वाटत होते. स्वराज्याच्या किती गुप्त मसलती, मन्सुब्यांचे हे वाडे साक्षीदार. पण आज... ढासळलेल्या भिंती, ऊघडेबोडके चौथरे, ऊखळलेल्या भुई सर्वच मूक झालेले. बहुधा महाराज गेले नि ईथल्या प्रत्येक चिऱ्यानेच चीरसमाधी घेतली.

झुंजार बुरजाच्या पोटातून ऊजव्या हातास वळून नेढ्यापाशी आलो. कातळास आरपार पडलेलं भोक. वर येंगायला त्याच कातळात जेमतेम पायठण्या. काय ही निसर्गाची अद्भूत घडण. असल्या बलाढ्य कातळासदेखिल आरपार भेदलय. वर गेलो. काय नजारा. मी बालेकिल्ल्याकडे तोंड करून बसलेलो.  वारं तर असं झोकदार. या बाजूनी शिरायच अन् त्या तळी उतरायचं.  केवढा परिसर नजरेच्या घेऱ्यात. तिथच भाकरी सोडल्या. अन् ताकात कुस्करून खाल्ल्या. तसच ते आंबाटढाण ताक पिलं. अन् भवताल न्याहाळत बसलो.

किती किती आठवू येत होतं. बा राजगडा अनादी, अनंत काळापासून तू या रहाळात वसला असशील. कितीतरी वाऱ्यावावधुळीचं झपाटलेपण, धसमुसळ्या पाऊसधारा, कळकळणारी ऊन्हं मुकाट सहन केलीस. किती राजवटी आल्या गेल्या, सत्तांतर झाली, परचक्र आली पण तू मात्र कुणाला बधला नसशील. तू अन् हा पलिकडला तोरणा. या सह्याद्रीचीच लेकरं. आवळीजावळी भावंडच तुम्ही. एकाच नाळेनं जोडलेली. दोघांच्याही अंगात अशीच रांगडी खुमखुमी. आखाड्यातल्या धटमुट पैलवानासारखी. या प्रचंड, बलदंड माच्यांचे शड्डू थोपटीत तुम्ही अनेक संकटांस मुठमाती चारली असेल. मोप परकीय आक्रमकांना आस्मान दाखविले असेल. कैक विघ्नांस चितपट केले असेल. अन् पुन्हा गर्जना करीत थांबले असाल या सह्याद्रीच्या आखाड्यात. मायमराठीची माती अंगास लावून. अजिंक्य म्हणून...

तुमच्या याच जेतेपणाची तर भूल पडली त्या जाणत्या राजास. वय वरूस आवघं पंधरा सोळा. मिसरूडाचं मवाळपणही अजून वधारलं नव्हतं. जहागिरदाराचं पोर ते. पर ऐशोआराम त्यास कधी रुचलाच नाही. पाचपक्वानं पोटास पचलीच नाही. दिनरात या आडरानात फिरून त्याचं सख्य जडलं तुमच्याशी, या तालेवार सह्याद्रीशी, ईथल्या दगडधोंड्याशी. नि लंगोट्या नेसलेल्या मावळ्यांशी. त्यानी तुम्हास लळा लावला. अन् तुम्हीही त्यावरून जीव ववाळून टाकला. त्यास कटीखांद्यावर मिरवलं. त्यानी तुम्हास स्वातंत्र्य दिलं. तुम्ही त्याचं स्वराज्य राखलं. आबाद केलं.

बा राजगडा अजून तुझ्या ह्रदयात तो शिवकाळ जसाच्या तसा जीवंत असेल ना. तोरण्यावर सापडल्या धनाने तुला ही तटबुरूजांची लेणी जडवली. रामाच्या पावलानी शीळेची अहिल्या झाली. इथं शिवरायांच्या पावलांनी तुझाही दुर्लक्ष्यतेचा शाप सरला. अन् नवी राजधानीच वसवली, बारा मावळच्या राज्यी. किती घटनांचा तू साक्षीदार. या तान्हुल्या स्वराज्यास तू जोजविलं असशील. ईथल्या भर्राट वाऱ्यानं त्याचे कान फुंकारले असतील. या गुंजवणी, कानंदी, मुळे, मुठेनं त्यास न्हाऊमाकू घातलं असेल. ईथल्या अवसेच्या कभिन्न रात्रींनी त्यास काजळतीट लावलं असेल. ईथल्या मावळी लेकरांनी जीवाचा खेळणा करून स्वराज्याचा हा पाळणा आंदोळला असेल.

ऐन मध्यरात्री सिंहगडावर पेटलेल्या चुडीनं तुझा बालेकिल्ला खडबडून जागा झाला असेल. अफजलाच्या वधास तुझेही बाहू फुरफुरले असतील. पण सईबाईसाहेबांची काळजी घेण्यास तू इथेच थांबला असशील. मायेचं छत्र हरपल्या शंभूबाळाच्या आकांतानं तुझही काळीज पिळवटल असेल. आग्र्यास जाणाऱ्या राजांस तू थोपण्याचा यत्न केला असशील. डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्या जिजाऊंच्या अश्रुंनी तूही गहिवरला असशील. बैचेन होत त्यांच्यामागून येरझाऱ्या घालत असशील. सती जाणाऱ्या जिजाऊंच्या वज्रनिर्णयानी डगमगला असशील.शास्ताखानाची बोटं तोडून आलेल्या राजांस तू आपल्या सुवेळा-संजीवनीचे बाहू पसरून अलिंगण दिले असशील. पुरंधराचा तह, पन्हाळ्यातून सुटका, सुरतेची लुट, तेवीस किल्ले पराक्रम तरी किती कथावे! त्याच्या गुप्त मसलती, लढाईची खल्बते, आक्रमणाचे मन्सुबे, गनिमीकाव्याचा सुलतानढवा या सगळ्याचाच तू साक्षीदार.

विचारांच्या आचेवर आठवणींच दूध ऊतू जात होतं. भानावर आलो. नेढ्यातून ऊतरून सुवेळाकडे निघालो. खरच झोकदार हो. असं म्हणतात शिवराय गड पाहण्यास आले. अन् या माचीवर आले असता पहाटेच्या समयी पुरंधरामागून सुर्योदय होत होता. ती रम्य वेळ पाहून राजांनी माचीचे नामकरण केले सुवेळा. खरखोटं त्या माचीस ठाऊक. पण मला वाटतं.ती फक्त त्या दिवसाची सुवेळ नव्हती. तर येणाऱ्या स्वराज्याचीच ती सुवेळ होती बहुधा हे त्या जाणत्या राजाच्या चौकस व दूरद्रुष्टीने हेरलं असावं.

सुवेळा खरच झोकदार हो. जणू एखादी धामण सळसळत पुढे जावी तशीच. नखरेबाज तटबंदी. अपार दूरवर धावत गेलेली. जागोजागी जंग्या. मुख्य तटबंदीच्या आत आणखी एक तटबंदी. नि दोघांच्या मधून जेमतेम माणूस जाईल एवढी नळीची वाट. शेवटास आलो. ऊजवीकडील भाटघर धरण सोन्यासारखं झळाळ्या मारत होतं. तर डावीकडील साखर, चिरमोडी, गुंजवणी गावं जणू पोरींच्या सागरगोट्यातील खडे. एक इथं, एक तिथं. पुरंधर नि कोंढाण्यास पाहून वाटलं. अजुनही ईथं तलवारीचा खणखणाट ऐकू येतोय. तानाजी मालुसरा उदयभानाच्या छाताडावर नाचत आहे. तर मुरारबाजी दिलेराच्या मुंडक्यास पायदळी तुडवत आहे. धन्य त्या वीरांची....

माघारा वळून बालेकिल्ल्याकडे निघालो. ईथली चढण अंगी येणारी. आधी सपाटी, मग झाडांच्या गर्दावळीतून गेलेली वाट. इथं कड्यास भली लांबलचक मधाची पोळी लटकलेली. पुढं कातळात चिणलेल्या जेमतेम पाऊलं ठेवण्यापुरत्या पायठण्या अन् त्यापुढं कड्याचं टेपाड. कड्यास अंग घाशीत, लोखंडी सळ्यांस धरून , खोबण्यातून बोटं गुंतवित अंग वर ओढायचं. सगळा ऊभार. श्वास अगदी कड्यावर आदळून पुन्हा आपल्या नाकातोंडास धडकतो. धन्य त्या राजपरिवाराची. या असल्या दुर्गम वाटेवरून जिजाऊ, अवघं राणीमंडळ ये जा करीत असेल.त्यांचे ते ऊष्ण श्वास अजूनही या कड्यानी ऊरीपोटी सांभाळले असतीलच. वर डोक्यावर पुर्वाभिमूख अगडबंब महाद्वार. नि शेजारी दोन्ही बाजवांस महाबलाढ्य बुरूज. या द्वाराची खासियत ही की, अगदी जवळ जाईपर्यंत कोणास कल्पनाही येत नाही की आपल्या डोक्यावर या महाअडचणीत असा राजस दरवाजा बांधलाय्. इथेच कुठं तरी अफजल्याचं मुंडकं पुरलय. प्रचंड महादारातून आत बालेकिल्ल्यावर प्रवेशलो. महाद्वाराच्या महिरपी कमानीतून दूरवर धावणारी सुवेळा नि भाटगर धरण अन् दूरवर पसरलेला अजोड सह्याद्री दिसत होते.

पायऱ्या चढून, अर्धचंद्राकार तळं मागं टाकून खाशांच्या वाड्यात आलो. वर दोघच होतो. गूढ शांतता. वाड्यांची अवस्था मनास डाचत होती. कधीकाळी स्वराज्याची पंढरी असलेले हे गडकोट आज मात्र केविलवाणे भासत होते. नाही म्हणायला भगवा ध्वज मात्र वाऱ्यावर त्याच दिमाखात फिरत होता जसा साडे तीनशे वर्षापुर्वी. केतन डोळे मिटून बसलेला. मी बालेकिल्ल्याचा मावळतीचा ऊतार उतरलो. टाकी पार करून पुढच्या बुरुजापर्यंत आलो. दोन्ही बाजवांनी पडझड झालेले वाडेहुडे होते. भिंतींचे चिरे ढासळले होते.आत झाडावळी, गवताचे वाळलेले ठोंब माजलेले. कित्येक कोपऱ्यात कौलांच्या खापराचे ढीग पडलेले. सगळच मनावर मळभ आणणारं. सूर्य हळूहळू मावळतीस झुकत होता.

मनी ऊफाळलं राजा रायगडी गेला. किती अपार दुःख दाटलं असल राजगडा तुझ्या ठाई. तिन्ही माच्यांसह हा बालेकिल्ला हातपाय पोटाशी बांधून मुसमुसला असेल. रायगडाकडे मोठ्या आशेनं पाहत असशील. रायगडही तुझी समजूत काढत असेल. "तू जसा राजास सांभाळला, तसाच मी ही जीवापाड सांभाळेल." त्याच्या या बोलण्यामुळेच तुला धीर आला असेल. तुझा जीव भांड्यात पडला असेल.

पण गड्या राजगडा! खरं सांगू राजा तुला सोडून कधी गेलाच नाही रे. तो रायगडीही गेला तो तुला घेऊनच. त्याच्या काळजात. अरे रायगडीच्या तख्तावरूनही तूच दिसावा असा त्या राजाचा हट्ट. तसच बांधकाम. किती बरं हरकला असशील तू १५९६च्या ज्येष्ठाच्या त्रयोदशीस. रायगडाच्या नगारखान्यावर निनादणाऱ्या शिंगे, कर्णे, तुताऱ्या, नगाऱ्यांनी ही आनंदाची वार्ता तुजपर्यंत पोचती केली असेल.  तू सांभाळलेला शिवबा आज छत्रपती जाहला. तुझ्या अंगणी लावलेलं रोप. आज गगनतरू झाले. अवघा महाराष्ट्र त्याच्या शीतळ सावलीत सुखाने नांदत होता. हे बळीचं राज्य. नव्हे हे रामराज्य. नव्हे नव्हे हे तर स्वराज्य. तुझ्या आनंदास तर गगन ठेंगणं. सर्वजण ऊगवतीस नमस्कार करतात. तू मात्र मावळतीस नजर लाऊन बसला असशील. शिवसूर्याचं दर्शन घेत असशील. राजाला तरी तुज्याविना कुठे चैन. जगदीश्वराच्या दर्शनास येताना घटकाभर का होईना तो तुला पहावयास थांबत असेल. मनभर न्याहाळत असेल. आणि... आणि त्या चैती पुनवेनं घात केला. रोज दिसणारा राजा आज दिसलाच नाही. अन् धडाडली असेल चिता जगदीश्वरासमोर. कुणाची? कुणाची ही चिता? काळजाचा ठोका चुकला असेल. नाही नाही त्या विचारांची अपशकुनी गिधाडं मनात फडफडली असतील. अन् मावळतीहून येणाऱ्या वाऱ्यांनी रायगडाचा निरोप तुला सांगितला असेल.... " आपला राजा गेला....................." अरे देवा आभाळातून वीज कोसळावी नि ठाईच जळून जावे असा तू कोसळला असशील. चिऱ्यांचा धीर सुटला असेल. ऊर फुटून तू तोरण्याच्या गळ्यात पडून रडला असशील. पुरंधर, सिंहगडाने ऊर पीटला असेल. पद्मावती, काळेसरीनही टीपं गाळली असेल.

ती जळती चिता पाहून तुही आपले डोळे मिटून घेतलेस. ज्या दिठीनं राजा पाहीला त्यास जगात अजून काही पाहण्यास काय ऊरलं होतं. अम्रुत चाखल्यानंतर तोंडी लावायास काय ऊरणार. काहीच नाही. तू ही समाधी घेतलीस. अगदी चिरसमाधी.

बालेकिल्ल्यावरून पद्मावती राऊळात आलो. मघाची सर्व गर्दी गडऊतार झालेली. थोडा कचरा होता. तिथलेच निर्गुडीचे टहाळे तोडले नि पुढचा परिसर झाडला. वेगरेदादा भेटले. त्यांस समजल की आम्ही ऊद्या इथून चालत रायगडास जाणार आहोत. त्यांनी आम्हास मार्ग सांगितला. आता माझ्यापुढे हा प्रश्न की कोणत्या मार्गाने जायचे? गुगलच्या की वेगरेदादांनी सांगितलेल्या.  केतनला म्हणलं बघू उद्या ठरवू.

वाटलं गडावर दोघच मुक्कामी. पण आणखी तिघे सोलापुरचे होते. विठ्ठल, राहूल नि आदित्य. ते आदल्या दिवशीच आले होते. वळखीपाळखी झाल्यानंतर जेवण एकत्रच करू म्हणालो. आणि घरच्यांच्या फोननंतर मला माझ्या बुध्दीवरून एखादी फाटकी पायताण ओवाळून टाकावी वाटली. चार दिवसाची पिशवी भरायच्या नादात मी नको त्या ईतक्या गोष्टी कोंबल्या की माझी जेवणाचे सामन असलेली पिशवी घरातच विसरून राहिली. बिस्कीटचे पुडे, मैगी, डाळ तांदूळ, मीठ मसाले सगळच घरी, बरं हे मी वागवणार होतो म्हणून केतनला काहीच घ्यायला नव्हते लावले. दुपारच्या जेवनाचा फक्त त्यास डबा सांगितलेला. तरी नशीब ते पोरगं हुशार होतं. त्यानी थोडं डाळ तांदूळ घेतलेले. पण चार दिवस त्या आडरानात कसं निभवणार या विचारात असताना मदतीस धावले सोलापुरकर. त्या भावांनी आमची अडचण जाणली. ते दुसऱ्या दिवशी गडऊतार होणार होते. म्हणून त्यांनी त्यांच्याजवळचे बिस्कीट, मैगी, चहापुड, साखर, मीठ मसाला सगळं देऊन टाकलं.खरच असा सह्याद्री जवळ आणतो माणसाला. कोण कुठली पोरं ती. एका दिवसाचीही नीट ओळखदेख नाही. पण भावांनी हा हा म्हणता आमचा तिढा सोडवला.

केतनकडील व त्या मित्रांकडील तांदूळ, डाळ, कांदे बटाटे काढले नि चुलीवर खिचडीभाताचा टोप चढवला. कसं करायच कुणासच माहीत नाही. आधी तांदूळ की आधी तेल इथून श्रीगणेशा. त्यात चुलीसुध्दा इतक्या आडमुठ्या की एकवेळ पाणी पेटेल पण यांनी नुस्ता ऊच्छाद मांडलेला. धुरानी मात्र चांगलाच धिंगाणा चालवलेला. सगळ्यांनी खोकून खोकून जगभरच्या माऊलींना दंडवत घातले. पुरंधरामागून लालसर वाटोळा चंद्र ऊगवलेला. आधी विश्वासच बसेना हा चंद्र. पहाटेस सूर्याचे लालसर बिंब दिसते अगदी तसाच. त्याचं चांदणं आभाळातून धरणीवर सांडत होतं. त्याचं चांदणं पद्मावती तलावात सांडलेलं. नि अवघं पाणीच चंदेरी झळाळीनं नटलं. बालेकिल्ला, माचीच्या तटबंदी रात्रीही अगदी ठसठशीत दिसू लागले. राजगडावरील त्या नीरव शांततेत थंडगार रात्रीत चुकतमुकत केलेला तो वाफाळणारा खिचडीभात म्हणजे नुस्तं सुख हो.....

लवकर निजलो. कारण खरा कस लागणार होता ऊद्या. ऊन्ह भडकायच्या आत योग्य मजल मारायची होती. पहाटेस उठलो. सोलापुरकर भावांचा निरोप घेऊन निघालो. नजरेसमोर धावत होती संजीवनी.

अहाहा काय ती संजीवनी माची चालावी तेवढी थोडी, पहावी तेवढी कमी आणि सांगावी तेवढी अपुरी. तिचा झोक, डौल, लचकमुरड, मर्दानी ताठा, वास्तूकला, स्थापत्यशास्त्र, बांधकाम सगळच अतर्क्य, अविश्वसनीय, अविस्मरणीय. ईतर दोन माच्यापरिस या बाजूस ऊतार थोडा ऊणा. हल्ला व्हायची दाट शक्यता या बाजूने. म्हणून राजांनी खास लक्ष्य देऊन बांधविलेली ही संजीवनी. दुपेडी तिपेडी तटबंदी, जागोजागी बुरूज, त्या बुरजांसही संरक्षक आवरण म्हणून दुहेरी तिहेरी चिलखती तटबंदी. दोन तटबंदीच्या मध्ये नळीची वाट. त्यात ऊतरण्यास जागोजागी जिने. अगदी सैन्यांच्या बराकीच त्या. नव्हे नव्हे संजीवनी काय हे सांगणं मज अडाण्याचं काम नाही. त्या जाणत्या राजाच्या चौकस दूरद्रुष्टीस जे तीनशे वर्षापुर्वी दिसलं ते आजही आमच्या दिठीस पडत नाही. संजीवनीवरून चालताना फक्त आश्चर्यचकीत होणं एवढच काम आपल्याला असतं.  असं वाटत होतं की भल्या मोठ्या आर्ट गैलरीतून चाललोय. आणि दोबाजूंस जगभरच्या अद्भूत कलाक्रुती ठेवल्यात. महाराष्ट्रातच काय पण भारत वा त्याबाहेरही कोणत्या गडास एवढे मजबूत नि गोमटे बांधकाम नसावे. जाताना ऊजव्या हातास दूरवर न्याहाळलं. हो तेच होते ते एक गोलाकार बुधला व त्यापुढे एक शिंगट. तो बुधला तिकोन्याचा नि शिंगट म्हणजे त्यासमोरचा तुंग.

माचीच्या ऊपत्यकेवर आलो. शेवटपर्यंत जाऊन माघारा वळलो. आळं दरवाज्यातून बाहेर पडलो. संजीवनीस अर्ध प्रदक्षणा घालत घसरड्या ऊतारानी ऊतरत तोरणा राजगडाच्या दांडास लागलो. ही सगळी वाट टेकाडांच्या माथ्यावरून गेलेली. बरेच चढऊतार, झाड झाडावळी पार करीत होतो. सकाळचं मऊ ऊन अंगाशी लगट करीत होतं. पण थोड्या वेळात हेच मवार ऊन कातडी करपवणार होतं. म्हणून बेगीनं पावलं ऊचलीत होतो. मागं राजगड नि म्होरं तोरणा या मधल्या वाटेवर आम्ही. झाडझाडावळी पार करून मोकळवनात आलो. वाटेस आडवी डांबरी सडक लागली. खरी परीक्षा आता. कोणती वाट निवडायची? कारण मी गुगलवरून काढलेले नकाशे या डांबरी सडकेने जाणारे होते. वेगरेदादांनी सांगितलेला मात्र वेगळा. डांबरी ओलांडून पुन्हा तोरण्याच्या वाटेनं निघायचं. वाटेत एक पडकं झोपडं. त्याम्होरं दोन घरं. त्यांस बालवडाची वाट पुसायची. तिथून पुढं शेणवड, पासली. मग पासलीच्या पुलावरून केळद खिंडीच्या अलिकडं तळात ऊजव्या हातास कच्ची वाट फुटते. तिनं वर डोंगरमाथ्यावरचा रस्ता गाठायचा. ह्या रस्त्यानं सरळ सिंगापूर. हा वेगरे दादांचा तोंडी नकाशा. जो मी पानावर काढून घेतलेला.

मनात चलबिचल. कोणती वाट निवडावी. शेवटी मनात पक्क केलं. शिवराय असे शक्तिदाता. गुगलचे नकाशे पिशवीत कोंबले. निघालो वेगरे दादांनी सांगितलेल्या वाटेवरून. रानातली वाट तुडवित. थोडक्या अवधीत ते पडकं झोपडं लागलं. वेगरेदादांनी सांगितल्या नकाशाची पहिली खूण. निर्णय घेतला इथच मैगी करायची. झोपडीत कुण्या लक्षुमीचा संसार होता कुणास ठाव? अगदी ताट, वाटी, पळीपातेल्यापासून ते पांघरूणापर्यंत सगळच वसाड वाऱ्यावर पडलेलं. कुणी या बंबाळ्या रानात संसार थाटला असल. उन्हा पावसात ज्या घरानी आधार दिला त्यास असं बेघर करताना त्यांस किती दुख वाटलं असल. भुई जागोजागी ऊकरलेली. किती दिस त्यावर कोण्या लक्षुमीचा शेणामातीचा मायेनं हात फिरवला नसल. जेव्हा घर नांदतं असल तेव्हा चिल्यापिल्यांचा नुस्ता कलकलाट असल. पण आता झोपडी थकलीय. जुन्या आठवणी ऊगाळत येणाऱ्याजाणाऱ्या वाटसरूस आपला घटकाभर विसावा देती.

पुढच्या वाटेनं चालतं झालो. वाटेवर कोणी भल्या ईसमांनी बाणांच्या खुणा केल्या होत्या. त्यांचा पाठलाग करीत निघालो. दोबाजूंनी करवंदी, तोरणीच्या जाळ्या झुरपुटं. करवंदी पांढऱ्या फुलवऱ्यानी फुलारलेल्या तर काही जाळ्यांस हिरवी कच्ची करवंद लगडलेली. काय देवाची करणी. करवंदीची फूलं पांढरीधक. मोगऱ्यासारखी. नि आतून फळ येतं. काळ करवंद. या कच्च्या करवंदाची चटणी बेस होते. मुठभर घ्यायची. दगडाखाली ठेचायची चिमूटभर मीठ, तिखट नि नावापुरतं वरून तेल. अशी आंबट तुरट चटणी की भाजी झक मारती राव. वाटेत देवराई लागली. देवाचं अनगड ठाणं. कधीपासून हा देव या रहाळाची या रानाची राखण करीत असेल. त्याचं त्यालाच ठाव. देवास दंडवत घातलं. पुढं नारळ फोडलेला. ऊचलला (प्रसाद म्हणून) निघालो.

नाकासमोर तोरणा ठेऊन मजल दरमजल करीत होतो. एकदम झाडांच्या गर्दीतून आलेल्या ऊंच कळकटास झेंडा लावलेला दिसला. त्यातळी दोन घरं. नकाशातील पुढचं निशाण. मनी आनंद. धावत घरापास गेलो. अंगणात कोंबड्या, दावणीस गुरे होती. हाकारे कुकारे घालीत चौमेरेनी हिंडलो. पण दादा येईना. खूपवेळ हाकारलं पण कोणच नव्हतं. आली का बिलामत! वेगरेदादांनी सांगितलेलं पुढची वाट यांना विचारा. पण इथं माणूसच नाय. अन् गुरंकोंबड्याना विचरून फायदा नाय. काय करावं सुचेना. वाट पाहत थांबावं तर पुढं जायला ऊशीर.

थोडावेळ थांबलो. तोरण्याची वाट सोडली. घरांपासून डाव्या हाताच्या टेपाडावर आलो. खाली ऊतार. वाटा फुटलेल्या. तळात दोन तीन घरं. भाताची खासरं. आणि लांब दूरवर मंदिराचा कळस नि घरांची वस्ती दिसली. बहुतेक हेच बालवड. पण नसलं तर भलतीकडच पोहोचायचो. लागलो ऊताराला. केतनला सांगितलं. वाट कुठली पण धरू फक्त त्या तळात घर आहे ते तेवढं गाठू. तिथं विचारू. धशीनं खाली निघालो. काही अंतर ऊतारल्यावर गुरांच्या गळ्यातील घाटरांचा आवाज आला. दगडावर चढून पाहील. आजुबाजूस शिंगाटं दिसली. ज्याअर्थी गुरं आहेत म्हणल्यावर गुराखी सुध्दा असणार. घातली साद. वरून आवाज आला
कोण हाय?
अन् त्या झाडावळीतून एक म्हातारा खाली आमच्याच दिशेस येत होता. सत्तरीचा मावळा तो. अंगकाठी अगदी बाभळीसारखी. गाठीची, कुळकुळीत पण टणक. अंगी कुडतं नि गुढघ्यावर धोतर. अन् डोक्यावर भलं कोळप्याचं ओझं. खाली तळातली भातशेती. तिथं दाढ भाजायला म्हातारा वरून खाली वझं वाहत होता.
बाबा ते वर घर तुमचच का?
व्हय!
बालवडास जाया वाट कंची?
हे काय ते समोर बालवाड. हा ऊतार उतारला ना त्या घरांपासून डाव्या अंगानी जा. खाली गाडीची कच्ची सडाक लागल. तिथून वाटंनी तडक बालवडास. या माझ्या मागं.
म्हणत म्हातारा तडातडा त्या ऊतारावरून निघाला. डोक्यावर ओझं घेऊन. आणि माझी मात्र त्यास गाठाया घसरकुंडी. निम्मा ऊतार आमच्यासोबत ऊतरल्यावर आज्यानं एक्या अंगास कोळप्याचं वझं टाकलं. हळहळत बोलला,
आता घरी गाठभेट झाली असती, तर च्या सरबत झालं असतं. पर आम्ही अशी कामात गुतलेली.
आज्यास पानतंबाकूसाठी पैसे दिले. व निघालो.
तळातल्या भातखासरांपाशी आलो. विहीर दिसली. सगळ्या बाटल्या गार पाण्याणं भरून घेतल्या. डोक्यावर पाणी ओतलं. जरा हुशारी आली. टौवेल ओला करून डोक्यास गुंडाळला. त्यावर टोपी चढवली (बेअर ग्रीलभाऊंची आयडीया) बालवडास पोहोचलो. इथून पुढं शेणवड गाठायचं. ते ही डांबरी सडकेनी.

भर बारा- साडेबारास शेणवडाची वळणं मागं टाकीत होतो. डांबरीवरून चालायला जीव जाम वैतागतो. त्यातल्यात्यात मधल्या पायवाटा शोधत होतो. सूर्य मात्र सूड ऊगवण्यासारखा पेटला होता. जाणायेणारे आमच्याकडे शिमग्यातील सोंगासारखं पहात होते. शेवटी आलं एकदाचं शेणवड. एका पोरास विचारलं
पासली किती लांब रे?
तीन किलुमीटर!
ऐकून जीवात जीव आला. फक्त तीन किमी तर चालायचय. कारण हॉटेल आता पासलीतच. जेवण बनवायास पुन्हा वेळ खर्ची पडला असता. पण कितीही चाललो तरी ते तीन किमी संपता संपेना. शेवटी झकतझुकत एक वाजता पासलीस आलो. गावच्या वाटेवर कुल्फिवालं दिसलं. ऊन्हानं भाजणाऱ्या आम्हाला ब्रम्हदेव भेटला. आमचा अवतार पाहून त्यानं विचारलं,
कुणीकडं निघालात?
रायगडास.
ईकडून कुणीकडून?
सिंगापूर नाळेनी.
काय आवो ते काय जवळ हाय! अन् आसल्या ऊन्हाचं. जावा आपलं माघारी. कशाला जीव दमवताय ऊगीच?
खरच रे बाबा. ऊगीचच जीव दमवतोय. पण हाच ऊन्हातान्हाचा विचार त्या राजानी अन् त्याच्या मावळ्यांनी केला असता तर कसं थाटलं असतं स्वराज्य? हा जीव दमवतोय फक्त त्यांच्यासाठीच. या देहाची कुरवंडी करील त्या जाणत्या राजासाठी.

केळद पासली हमरस्त्यावर हॉटेल अन्नपूर्णा दिसलं. जीवात जीव. तू व्हेज खाणार की नॉनव्हेज केतननी पुढचे प्लैन आखले. आणि आत गेल्यावर मेनू समजला, फक्त पिठलं नि भाकरी. काय अवस्था झाली असेल याचा अंदाच आलाच असेल. हॉटेलच नाव अन्नपूर्णा ऐवजी अन्नअपूर्णा ठेवायला पाहीजे वैगेरे फुटकळ विनोद झाले. पण हसायचही अवसान नव्हतं. पिठलं भाकरी सांगितल्या. पहाटे पाठकुळीस चढवलेला अवजड वेताळ ऊतरवला. खांद्याची पार वाट लागलेली. माझ्या बैगचा एक पट्टा तोरण्याच्या वाटेवर तुटलेला. त्यास गाठ मारलेली. पण ती गाठ खांद्यास अधिक रूतत होती. पोटऱ्यांनीही आधी कुरकुरून मग ठणकायला सुरूवात केलेली. सगळच दुखण एक्या अंगास सारलं नि भिंतीस डोकं टेकवलन् ते त्या ताईंनी जेवण वाढल्यावरच जागं केलं. तांदळाच्या गरमागरम भाकरी, वाफाळणारं पिठलं नि आंबे मोहराचा भात. झक्कास जेवलो. कारण आता हाता तोंडाची गाठ एकदम रात्रीच. जेवण करेतोवर दोन वाजले.

पोटं रिकामी तोवर ठीक. पण आता भरल्या पोटानी आळसावयास सुरूवात केली. तसच ऊन्हाचं पिशव्या पाठीवर घेतल्या. मावशींस सिंगापूरची वाट विचारली. त्यांनी केळदखिंडीच्या दिशेनं हात करीत
सिंगापूर तिकडं... त्या डोंगराच्या पार कोपऱ्यात हाय. या रस्त्यानी खिंडीपर्यंत जायच आन ऊजव्या हातास रस्ता गेलाय तिथं वळायचं. त्यानी मग शिंगापूर.

दुर्लक्ष केल्यानं पायाच्या दुखण्यानं दुखायचं सोडून दिलं होतं. केळद खिंडीचा डांबरी चढ अंगावर येत होता. पासली पूल ओल़ाडला नि आठवला नकाशा. पूल संपताच ऊजव्या हातास कच्ची वाट. पुढं एक घर.आम्ही काटकोनात जाण्याऐवजी तिरका रस्ता निवडला. वेगरेदादांस मनोमन मुजरा केला. आडवनातून घुसलो. पुढं घर लागलं. त्या माऊलीनी पुढची वाट दाखवली. वाटेस लागलो. झाडाच्या गुंतावळ्यातून अंग ढोसरित पुढं निघत होतो. वाट वाहती नव्हती. खरतर वाट नव्हतीच. झाडाझुरपुटातून जी जागा मोकळी तीच वाट. ठावकि एकच. डोंगरमाथा गाठायचा. अन् वाटेनं जाताना एका भल्या मोठ्या झाडांवर वानरांचं टोळकं दिसलं. त्यांस बगल देत झाडांतून वाट काढत होतो.एवढ्यात धसफस ऐकू आली. मी लक्ष दिलं नाही. केतनलाही सांगितल नाही. पण आवाज दोनतीनदा आला. त्यानंतर डिरकण्याचा आवाज. आता केतननही ऐकलेला. आवाज कशाचा ते ओळखलेलं. ते जे जनावर होतं ते आमच्यापासून तीस पस्तीस हातावरच होतं. दिसत नव्हतं. पण चाहूल जाणवत होती. वाट बदलली. अन् वर सडकेला पोहचलो. दोघांचाही अंदाज एकच होता. रानडुक्करच ते. कारण याआधीही ते रानात पाहीलय. फक्त दुसऱ्याची फाटल म्हणून ते लपवलेलं.

इथून पुढं परत डांबरी सडक. मोक्कार चालणं. वैताग. पण सांगणार कुणास. हौस आमची. निघालो गुमान. गप्पा मारत. पुढं सडक एका टेकडावर वळली. चारदोन घरांची वस्ती. एकदम चेकाळलो. चला आलं सिंगापूर. तिथं पोहोचल्यावर समजलं हे कुसारपेठ. त्यापुढं एकलगाव मग खाली ऊतरून सिंगापूर....... हरे रामा. अजून बरच चालायचय.

चार वाजून गेलेले. मी सकाळी निघताना अंदाज बांधलेला चार साडेचार पर्यंत नाळेत पाहीजे. पण चार तर आम्हास इथच वाजलेले. सिंगापूर गाठायास पाच साडे पाच वाजतील. मग ठरवल की मुक्काम खाली दापोलीत करण्याऐवजी वर सिंगापुरातच करू. नाळ ऊद्या पहाटे ऊतरू. मुक्काम ईथच म्हणल्यावर मी जास्तच सैलावलो. फौजीचा स्टैमिना मात्र जबरदस्त. जवळपास पाचास आम्ही एकलगावास पोहोचलो. डांबरी संपून आता कच्ची गाडी सडक लागलेली. आता आम्ही सह्याद्रीच्या ऐन धारेवर होतो. ऊजव्या हातास घाटमाथा नी डावीस खाली तळकोकण. ऊन्ह ऊतरायला लागलेली. लिंगाण्याचा मस्तवाल कडा आणखी नजरेत भरत होता. पलिकडं रायगड मात्र समाधी लाऊन बसलेला. जगदिश्वर नि नगारखाण्याचा ऊभार ईथून जाणवत होता. मागून एक टेम्पो आला त्यानं दहा मिनीटात सिंगापुरास सोडलं.

जवळपास सव्वा पाचला आम्ही सिंगापुरास पावते झालो. काय करायच विचार मनात ऊठत होता. एक मन म्हणत होतं नाळ ऊतरावी. तर दुसरं म्हणत होतं, आता थोड्या वेळात अंधार पडल. वाट पायाखालची असली तर काय नाय. पण ही वाट नवखी. रान ही वळखीदेखिचं नाही. त्यात दोघच. रस्ता ठावकी नाही. त्यात मी दुर्गभ्रमणगाथेत वाचलेलं आप्पांना याच नाळेत बिबट्याचं दर्शन झालेलं. याच विचारात एका आंगणात आलो. चारपाच आजा आजी बसलेले टकळ्या हाणत. विचारलं
बाबा नाळ कशी हो ऊतरायला?
ही नाळ सोप्पी. या बाजुच्या बोरात्याची नि आग्याची मोठी आवघाड. तासा दोन तासात दापुलीत जासाल. वाट म्हायतीय का?
नाय ना.
कुठून आलात?
राजगडाहून!
तिथं बसलेली आजी म्हणाली
राजगडावून. अन् दोघच. बया... आमचं मावळी माणूस देखून याव्हढं चालायचं नाय आता. कशाला जीव दमिवताय.?
हा प्रश्न सरावाचा झालेला.
नाळ हाये सोपी. पर तिथवर तुम्हास सोडाय पायजे. या वाटांना मधी मैंदाळ ढोरवाटा फुटलेल्या. एकदा का नाळेस लाऊन दिलं का मंग न्याहार जासाल खाली.
आरं पर सात आठ जण तरी यायचास. दोघच निघाला.
आता कोण येईनाच. काय बळनीच ओढू का?

आज्या ऊठला. पुढं व्हऊन वाटेस लागला. आम्ही त्याच्या मागं. हा ही म्हातारा सत्तरीचाच. पण मावळीच रगात अंगात. तरातरा वाटेवरून धावत होतं. आमची मात्र म्हाताऱ्याला गाठताना धावाधाव. ठणाठणा आज्या दगडधोंड्यांवर पाय टाकीत पार होई.
आरं पोराहो बोला कायतरी? मुक्यानं वाट कशी सरायची?
मग निघाल्या गप्पा. इथही कुण्या भल्या इसमाने वाटेवर ठिकठिकाणी बाण काढलेले होते. त्यास लाख धन्यवाद. आजा आपला बोलत होता.
आता हे आपलं घर पघातलं ना. त्यावरची कौलं लावली का, ती खालून याच वाटंनी वर आणल्यात डोक्यावर. दिवसाला तीनचार खेपा. मी मनातून आज्यास दंडवत घातला. त्या वाटेवर एवढी जागा नव्हती नायतर पायीच लोटांगण घातलं असतं. खरच असली धट्टीकट्टी कामं हा हा म्हणता करणारी पिढीच आता नामशेष व्हायला लागलीय. आता सगळा माल हायब्रीडचा. नाजूक नकक्षार.
आजा बोलतच होता. आता घरात पोरं नातवंड हाये. आल्यात सुट्टयांपुरती. वळवाच्या पावसावानी येतात नि जातात. मंग एवढ्या मोठ्या घरात मी, म्हातारी नि गुरं. हे सांगताना त्याची बोलण्याची मेख मनास टोचून गेली.

एका कातळ टप्प्याच्या ऊतारावर जरा फाटली. पण आजा शेवरीच्या फुलासारखा तरंगत ऊतरून पार गेलासुध्दा. मला एकतर बुटांची सवय नाही . त्यात मी घातलेले बूट अगदी डोक्यावर घेऊन मिरवण्यासारखे होते. काढले पायातून. अन् सड्या पायानिशीच नात्र ऊतरू लागलो.

आज्यानी जवळपास अर्धी नाळ आम्हास ऊतरवलं. आणि एका कातळकड्यावरून समोर पसरलेल्या रानात दाखवू लागला.
हे असं नाळीनं ऊतारलात ना की खाली ते पिवळं गवात दिसतय का तिथं निघसाल. तिथून पुढं जायाचं म्होर ऊजवीस वढा लागल. तिथून वाटनी जायचं. ही वाट काय सोडायची नाय. सरळ दापुलीस. मी घरी जाईस्तवर तुम्ही पोहचसाल.

नाळ ऊतरायास सोपी. पण आता ऊतारावर माझ्याच पायाचा मला भरवसा ऊरला नव्हता. इतकी चढाई ऊतरायी केली होती पायांनी, की गुडघे कोणतीही आगाऊ नोटीस न देता कचकन मुडपायचे. आणि पाठीवरचा अवजड वेताळ बोकांडीवर चढायचा. यामुळं ऊतरताना गती बरीच कमी झालेली. दोन्ही बाजूंस गगनी दडलेले सह्याद्रीचे ढंगाळे डोंगर. मागे ऐन घाटमाथ्याचा ऊभार. आणि खाली तळात झुरपुटात असलेलं दापोली. आजुबाजूस गच्च रान. आणि त्या वाटेनं ऊतरत असलेलो आम्ही दोघे.

सूर्व्याने त्याची ड्यूटी आवरती घेतली. अन् हळुहळू कडूसं पडायला लागलं. पिवळ्या पडलेल्या गवताच्या पठारापर्यंत बराच ढाळ ऊतरला होता. अंधारायला सुरूवात झालेली. मागे वळून पाहताना दोन डोंगरांच्या बेचक्यातील नाळ अधिक भयानक वाटत होती. दगडांवर आखलेल्या बाणांच्या खुणेच्या दिशेने निघत होतो. हे पुसट दिशादर्शक बाण त्या बंबाळ्या रानात आमचं सारथ्य करीत होते. त्यांचा भलामोठा आधार होता. आम्हीही थकली पावलं उचलत शक्य होईल तेवढं अंतर कापित होतो. पायातलं बळ आता संपलेलं. ऊतारावरून ओंडका आपसूक घरंगाळावा तशीच गत झालेली.

आणि ज्याची भिती तेच झालं. नाळीतून ओढ्यात ऊतरलो. इथून बाण पैल तीरावरच्या पाऊलवाटेस दाखवलेला. निघालो. भवतीनं अंधारानी पंख पसरले. वीजेऱ्या काढल्या. त्याच्या प्रकाशात निघालो. कीर्रर्र झाडी नि अंधारातच एका गचपणात वाट चुकलो. तिथे दोन वाटा फुटलेल्या पण कोणत्या वाटेनं जायचं बाण नव्हता. खूप वेळ पालापाचोळा सारून बाण शोधले. झाडांचे बुंधे तपासले. पण बाण गवसेना. पुन्हा थोडं माघारी वळून बाण हुडकू लागलो. पण व्यर्थ. आता पुढं काय?
दोन्हीपैकी कोणती वाट धरावी? वाट चुकून भलतीकडच निघालो तर. असल्या अंधारात इथं थांबणही सोईचं नव्हतं.
मोठा असल्यानं निर्णय मलाच घ्यावा लागणार होता. मग ठरवल. आता कोणत्याच वाटेनं नाही जायचं.  ओढ्यात उतरायचं. व त्या कोरड्या ओढ्यातूनच चालत रहायचं. ओढा दापोलीगावापासूनच गेला असेल. किंवा ओढा पुढे काळनदीस भेटत असेल तिच्या पल्याडच्या तीरावर डांबरी सडक. ती गाठून वाघेरी गाठायची. जी महाराजांची इच्छा ते होईल. निघालो ओढ्यातुनच. अंधाराचच. दगडाधोंड्यांवर पाय टाकीत. उगाचच मोठ्या आशेने खुणेचे बाण धुंडाळीत. सगळीकडूनच अंधार. असं वाटत होतं एका भल्यामोठ्या अंधाऱ्या विहीरीत आम्ही अडकलोय. बराच वेळ चालत होतो. छातीत दम भरलेला. केतनला पाच मिनीट विश्रांतीस थांबवले. गाव जेव्हा येईल तेव्हा येईल, निदान नाळ तरी उतरलो हेच सौख्य. पण जास्त वेळ थांबून निभावणार नव्हतं. आप्पांच्या दुर्गभ्रमण गाथेतील एक वाक्य मात्र मनात सारखं घोळत होतं. याच सिंगापुरच्या नाळीतुन राजगड ते रायगड करताना त्यांस बिबट्याचे दर्शन घडले होते. आम्हाला निदान आतातरी ते दर्शन नको होतं.

दमल्याने ओढ्याच्या ऊंच काठावर बसलो. रानात रातकिड्यांची किरट चांगलीच गाजत होती.बाकी सारं शांत. सहज उजव्या हातास पाहीलं तर साधारण एक किमी अंतरावर वीजेचा दिवा दिसला. मानववस्तीची खुण. जीवातजीव आला. तो पेटलेला बल्ब पाहून एडिसनलाही इतका आनंद झाला नसेल तितका झाला. केतनला दाखवलं. आनंदानं मिठी मारली. गाव इतक्या जवळ आलय म्हणल्यावर थकलेलं अंग अजूनच सैलवार सोडलं. दहा मि. त्या अंधारात आम्ही फक्त तो लाईट पाहत बसलेलो...

तसच ओढ्यानी पुढं चालतं झालो. बाजूस शेती, मचाण अंधारात दिसत होते. दापोलीस आलो. माणसांचे आवाज, गुरांच्या गळ्यातील घाटरं, कुत्र्यांचे भुंकणे, टिव्हीचा आवाज, एखाद्या गाडीचा आवाज हे आवाज कानावर पडले. वाटलं आत्ताच अश्मयुगाची सफर संपवून मानववस्तीत आलोय्. एका मावशीच्या अंगणात उतरलो. जेवणाची विचारपूस केली. खांद्यावरली मढी लोटली. हातपाय खंगाळले. घरच्यांच्या फोनवरून शिव्या खाल्ल्या नि मग मोहरा मावशींनी वाढलेल्या ताटाकडे वळवला. पांढरा खळखळीत भात, चिकनच कालवन नि सुकं चिकन. दिवसभराच्या पायपिटीचा निरापिरा झालेला.... स्वाद तर अहाहा.... जेवलो. पोटगच्च जेवलो. झोपायला गावातील मंदीर गाठलं. सकाळी साडे सहाला पद्मावतीच्या राऊळातून सुरू झालेला प्रवास आज दापोलीच्या या दत्तम्ंदिरात रात्री आठ वाजता विसावला होता. अंथरूणं टाकली. शरीराची नि भुईची गाठभेट होताच डोळ्यांनी झोपेपुढं पापण्या टेकविल्या.

सकाळी ऊठलो. आज काळजी नव्हती. आता चारदोन गावं ओलांडलं कि रायगड. असा माझा (गैर)समज. दापोलीतून
काळनदी ओलांडली कि डांबरी सडकेनं पुढं वाघेरी, मग वारंगी, नंतर छत्र निजामपूर नि शेवटास रायगड. पण समजातील गैरसमज लवकरच दूर झाला. काळ नदीत फ्रेश होऊन मार्गस्थ झालो. ऊजव्या हातास रायगडाचा भला आडवा ऊभा डोंगर. ते समोर टोकदार टकमक, तो सातविणीचा खळगा, हा डोक्यावरला माडाचा नी मागील शेवटचा भवानीचा खळगा. तर नदीच्या त्या पल्याड दिसत होती काल ऊतरलेली सिंगापुरची नाळ. रौद्रभीषण, सह्यभूषण लिंगाणा, बोरात्याची नाळ, कावळ्याबावळ्याची खिंड आणि घाटमायथ्याची बेलाग तटबंदी.

सकाळच्या कोवळ्या ऊन्हात भराभर डांबरीवरील अंतर कापीत होतो. आज फाल्गुनातील वद्य त्रीतीया. तिथीनुसार शिवजयंती. आसपासच्या खेड्यापाड्यातून स्पीकरवर लागलेले बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे रायगडघेरा गर्जवित होते.

छत्री निजामपुराच्या धरणाच्या कच्च्या रस्त्यांनी टेकाड चढून निघालो. वारंगीत मैगी करून खाईपर्यंत घड्याळानी बरीच मजल मारली होती. त्यास गाठाया आता आमची धावाधाव. साडे दहा वाजून गेले. आणि सूर्याचा कवळेपणा सरला. आगीचे लोळ आकाशातून जमिनीवर वाहत होते. रस्त्याकडेच्या प्रत्येक झाडाची सावली आम्हाला खुणावत होती. मनोधैर्य खच्ची करायला पाहत होती. टेकडावर भलामोठा डेरेदार वड. त्याच्या सावलीचा अपमान मात्र करवेना. सावलीस थांबलो नी वाऱ्यानी असं काय स्वागत केलं. ऊभ्यानीच खांद्यावरल्या पिशव्या लोटून खाली बसलो.
बाहेर डोळं दिपवणाऱ्या ऊन्हाचा बराच दचका घेतलेला मनाने. पुन्हा ऊन्हात यायला शरीर धजावत नव्हते. ईतक्यात एक कातवडी वडाखाली आला. त्या झाडातळी मुंग्यांची मातीची वारूळं होती. त्यातले वरचे शेंडे अलगद तोडून घेऊ लागला. कुतूहल वाटलं. पुसलं
हे कशाला वो?
मासळी पागाया...
म्हंजी. ही माती गळाला लावता का?
ह्म.
मंग ती माती मासं खाया येतात, नि गळ खेचायचा. व्हय ना.
नाय. गलाला नाय. झिलास लावायची मेरंनी.
झिलास मेरंनी. ती ईघरत नाय पाण्यांत?
नाय ईघरत. त्यात थुक असतीय ना मुंग्यांची. त्यानी झिलं जड होता. नि तळात जाता.
धन्य त्या रानपुत्रांची. नि त्यांस अवगत असलेल्या या अगाध निसर्ग ज्ञानाची.

थकल्या शरीरास तसच रेटीत निजामपुराच्या घाटास लागलो. डांबरी वळणावळणाची ती सडक. तो चढ चढायला जीवावर आलेला. आता डोक्यावर टकमकीचा फडा काढलेला सुळका होता. अंगाभोवती वेटोळ्याचं डबोलं घेऊन बसलेला महानाग.
त्याच्या माथ्यावर भगवा ध्वज. जणू या नागाची लसलसती जीभ. कितीही चाललं तरी हा डांबरी घाट काय संपायचं नावच घेत नव्हता.

अति अति दमलो. अंगातली सगळी मस्ती आता जिरत होती. पण ईरशीर मात्र अजून अभंग होतीच. काही झालं तरी आज सिंहासनापास मुजरा रुजूवात करायचाच. थोरल्या राज्याच्या समाधीपाशी घटकाभर बसायचं. आडदांड रानातली ही एवढी तंगडतोड ज्याच्या जीवावर केली त्या माझ्या राजाशी चार गप्पा मारायच्या. झकतझुकत खिंडीपाशी पावते झालो.

यावेळेस ठरवलेलं की नाना दरवाजाने गड जवळ करायचा. ती वाट पाहिली नव्हती. घेतलेला निर्णय अगदीच योग्य ठरला. वाट पायवाटच. पण दोबाजूंस जाणती झाडे वाटेवर सावली धरून बसलेले. अशी शीतळता वाटेवर की बस्स. शरीरातील दम मात्र पुरता निवलेला नव्हता. पाच दहा मि. चालताच छाती भरून यायची. पडत झडत ऊठत सवरत राजसदरेवर पोहोचलो. सिंहासनापाशी आलो. या प्रवासामागची प्रेरणा, चेतना ही इथे आहे. तिथून जगदीश्वरास निघालो. वाटेत औकिरकर मावशींस भेटलो. चार गप्पा मारल्या नि मग ज्या भेटीसाठी जीव तडफडत होता तिकडे धावलो.

समाधीपाशी आलो. इथली शांतता कायमच मनावर ताण आणते. सांजसमय आलेला. वारा वाहतोय. चार दोनजण आहेत फक्त.  समाधीस भेटलो. अगदी कडकडून भेटलो. जिथं हा रयतेचा राजा विसावला त्याच्या सावलीतळी विसावलो. समोर दिसत होते दोन बुलंद पहारेकरी. प्रचंडगड नि दुर्गराज राजगड. परवा राजगडाहून या वख्तास आम्ही रायगड पाहत होतो नि आज रायगडाहून राजगड...

मधला सगळा प्रवास झरझर डोळ्यापुढून सरकत होता. संजीवनीच्या ऊताराने ऊतरता पडता पडता वाचलेलो. एवढ्या प्रवासात बालट काही आलं नव्हतं. तीळभरही अंगास खरचटलं नव्हतं.कितीदा तरी पायातील बळ संपलेलं. पण मनातील बळ मात्र कणभरही कमी झालं नाही. हे कस? कारण पावलोपावली एक गोष्ट जाणवत होती. ती म्हणजे हा  प्रवास करताना आम्ही दोघच नव्हतो. तर कोणती तरी तिसरी शक्तिही अद्रुश्यरूपानं आमच्या आसपास वावरत होती. जी आम्हास सावरीत होती. वाटांच्या भुलभुलैयातून योग्य वाटेस आणत होती. कधी आज्याच्या रूपानं नाळ ऊतराया मदत करीत होती. आमच्यावरील अरिष्ट वारीत होती. आमचं मनोबळ शतपटीनं वाढवित होती. दरदरत्या ऊन्हात वाऱ्याची झुळूक होऊन शीतळसय करीत होती. कोण होती ही शक्ती.... तिला नाव न दिलेलच बरं.... पण हा प्रवास आम्ही केला हे म्हणणं होईल अर्धसत्य. छत्रपतींनी आमच्याकडून करवून घेतला हे पूर्णसत्य...

या प्रवासात जे मणभर अनुभवलं त्यातलं खरतर कणभरही नीट मांडता आलं नाही. खरतर सह्याद्री वाचून आनंद मिळण्याची जागा नाही तर अनुभवून स्वर्गसौख्य गाठण्याची जागा आहे. आपल्या पुर्वजांनी त्याच्या अंगावर घडवलेल्या, तुडवलेल्या या घाटवाटा म्हणजे शिवकाळातील स्ट्रॉंग नेटवर्क आहेत. त्या जर अशाच वहीवाटीविना पडून राहील्या तर त्या वाटा, त्यांच्या इतिहासासह नामशेष होतील. येणाऱ्या पिढ्यांस या घाटवाटा केवळ नकाशात पहायला मिळतील. म्हणून प्रत्येकानीच या घाटवाटांचा अनुभव घ्यावा. इतिहास नावाचा पुरूष अजुनही तिथं वावरतोय त्यास गळाभेट द्यावी. पण... कळीचं फुल होताना जितका आवाज होतो तेवढ्याच शांततेनं, तितक्याच शालीनतेनं तितल्या निसर्गास शरण जात...
लेखनसीमा...

लेखन- © संतोष अंकुश सातपुते


अखेरचा मुक्काम. बुडणारा सूर्य, जगदीश्वर, दाटलेली हुरहूर

चालतोय.. चालतोय आणि चालतोय् रायगडच्या वाटे

सिंगापुरची नाळ...जाणती घाटवाट

केळद खिंडीने मोहरीकडे जाताना दिसणारा दुर्गेश्वर व लिंगाणा

सुवेळावरून दिसणारा डुबा नि पाठी राजगडाचा बालेकिल्ला

नेढ्यातील गारवा अनुभवताना...


आलं एकदाचं पासली... अन्नपूर्णा हॉटेल..थकलेले मुशाफीर


सड्या पायानीशी ऊतरती सिंगापुरनाळ




डुब्याच्या दाट झाडीतून ऊगवणारी सुवेळा






बालेकिल्याच्या कमानीतून दिसते हे स्वर्गसुख


राजगडावरचा लालसर चंद्रोदय

आणि रायगडी जाहले दर्शन...धनी मुजरा

इथूनच उतरलो नाळ...


x

Comments

  1. खूप छान...दांडेकरी शैली 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Prasad bhauuuu, ewdhi kuthe ho aapli lekhanimule shreemant aahe

      Delete
  2. अप्रतिम दादा, अन पहिल्या दिवशी बराच पल्ला हानला कि ओ. राजगडाच वर्णन खुपच सुंदर 😍❤️

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अमोलदादा...खूप आभारी....

      Delete
  3. अप्रतिम लेख

    ReplyDelete
  4. प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द सुचत नाही .... निशब्द!!!

    ReplyDelete
  5. दादा सुंदर..... तुमची ही मोहीम वाचताना तुमच्या सोबत आम्हीपण आहोत असच वाटल..... खूप छान लिहिलय....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १