राजगड तोरण्याच्या वाटेवरील झोपडे😗

राजगड तोरणा ट्रेक बरेच जण करतात. या वाटेवरच एक कौलारू झोपडं आहे. कोणी राहत नसलेलं. पण कधीकाळी ईथं नक्कीच कोणाचा तरी संसार फुलला असेल. राजीखुशीनं नांदला असेल. आज जरी झोपडीस अवकळा आलीय तरी कधीकाळी इथं गोकुळ नांदलं असल. या साऱ्याचीच आठवण काढीत ती म्हातारी झोपडी त्या बंबाळ्या रानात अनेक सह्य भटक्यांना घटकाभर निवारा झाली असेल... या झोपडीस समर्पित....



राजगड तोरण्याच्या वाटेवरी ते झोपडे
वाट पाहत बसले, डोळे लाऊन वाटेकडे

गगनोंच दोन दुर्ग, मध्ये इवलासा जीव
गच्च बंबाळ्या रानाची, पर त्यास नाही भेव

वाट पाहती कोणाची, प्राण आणुणीया दिठी
तग धरली अजून, कोणाच्या गा भेटीसाठी

किती झेलले या अंगी, ऊन पावसाचे डाव
मोडकळले बिचारे, सोसे नियतीचे घाव

अर्धे कौलारू झाकले, अर्धे उघडे बोडके
भिंत ढासळली एक, वासे मोडके, तोडके

कधीकाळी झोपडीत, चंद्रमौळी पंखाखाली
असेल नांदला संसार, सोनियाच्या पावली

कुण्या लक्षुमीने इथं, असेल थाटला संसार
आज ओसाड पोरका, पसरला वाऱ्यावर

मोडकी कोनाड्यात चूल, राख घेऊनीया पोटी
भूई उकीर वाट पाहे, मायेनं सारवण्यासाठी

तांब्या, ताटली, भगोनं, ऊशी, वाकळ जुनाट
पसरली अस्ताव्यस्त, निपचित ती मुकाट

राबराबुनी घरधनी असेल शेतात खपला
झोपडीच्या कुशीमंधी, दमून निवांत निजला

पोरा सोरांचा गोंगाट, अस्तुरीची लगबग
आठवता झोपडीच्या, ऊरी दाटे तगमग

गेले सरून गोकूळ, त्याचा राहीलाय भास
आठव काढीत झोपडी, मोजी अखेरीचे श्वास

तिची एवढीच आशा, तिची एवढीच आस
 वाटसरू भटक्यांचा, व्हावा सुखाचा प्रवास

म्हणूनी भटक्यांनो, छायेत घटकाभर बसा
मायेनं तिजला, तिची खुशाली हो पुसा!

आश्रयाला तिच्या,  जावा जरूर तिकडे
राजगड तोरणा वाटेसी, वाट पाही ते झोपडे...



संतोष अंकुश सातपुते
फोटो नेट साभार

Comments

  1. या झोपडीत धनगर वस्ती होती मी स्वतः यांच्याकडुन १९९५ साली १० रू देऊन तांदूळ घेतले होते व ते नंतर तोरण्यावर खिचडी करून सर्वांना खाऊ घातली आहे. या आमच्या ट्रेकच्या खुप आठवणी आहेत. यात आम्ही एका कंपनीत काम करणारे ११ जण एसटीने गेलो होतो यातील ४ जण स्लिपर घालून आले होते. ट्रेकची माहिती असणारे ३ जण होतो व हा ट्रेक करणारा मी एकटा अनुभवी होतो. एक जण सुटकेस व लेदर शुज घालून आला होता. अनेक गमतीजमती आहेत आमच्या या ट्रेकच्या. या झोपडीमुळे आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद संजय करपे

    ReplyDelete
    Replies
    1. Dada toch hetu aahe ki sarvana tichi 8van zalich pahije

      Delete
  2. वा , छान मांडणी

    ReplyDelete
  3. खरंच ....
    अगदी मनापासून सांगतो ..
    (ही निसर्गाची किमया आहे की पूर्वी तेथे
    राहत असलेल्या त्या कुटुंबाची पुण्याई ...
    कारण ती वास्तू अजून तिथे आहे हे नवल चं ...
    पण शेवटी ती तिचे काम अजिबात सोडत नाही , मग आश्रयाला आलेला कोणी गिर्यारोहक असो , जनावर असो किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी आलेला कोणी व्यक्ती !
    ��������������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १