मायमराठी अखंड मुजरा तुजला...


पैल दूर त्या क्षितिजावरी
ऊभी ठाकली एक आक्रुति
थकली, शिणली गलितगात्रे
धरी तोलुनी काठीवरती

धुळभरी जडशीळ पाऊले
नक्षत्र गोंदली खोळांवरती
पायपिटीची देई साक्ष ती
मजल दरमजल युगायुगांची

थरथर कंपित अवघी काया
जणु वाऱ्यावर पिंपळपान
महाराष्ट्र मातिचा उचलला
काळा, सावळा तांबूस वाण

अंगझाकल्या लुगड्याशी जरी
आज वेढला जुन जीर्णपणा
एकेकाळची गर्भश्रीमंती
दावी उलघडुनि राजखुणा

कशासाठी ती करून आली
व्रुद्ध जीवाची इतकी परवड ?
कोणासाठी प्रेम व्रुध्देचे
ठरे कैक त्रासाहुनि वरचढ ?

मजपाशी येऊन बसली व्रुध्दा
दूर लोटुनी हातची काठी
सांगु लागली तिची कहाणी
लपली जी सुरकुत्यांच्यापाठी

"ईथे जाहला जन्मचि माझा
या महाराष्ट्र उदरी
इथे नांदले, मुक्त वाढले
या क्रुष्णा, कोयना तीरी

सह्याद्रीचा कणखर बाणा
घोटविला मी तनामनात
सोनकिची मऊ म्रुदूलता
बाणविली मी नसानसात  

जात्यावरती मीच जाहले
मायमाऊली सखीसोबती
तिठ्यावरती, कट्यावरती
कधी शिवारी तिवढ्याभोवति

फडावरी बेहोश थिरकले
कधी बांधुनी छुन्नक चाळ
कधी मंदिरी भिजले भजनी
हाती घेऊन किणकिण टाळ

कधी दासाचा बोध मिरवला
कधी भाकिले पसायदान
कधी देहुच्या वाण्यासाठी
मीच जाहले अभंग ध्यान

कुणी माझ्यावरी रचली गीते
आर्या, भारुडे, श्लोक नि कवणे
माझ्यास्तव जनओठी स्फुरले
सामवेदी कैलास लेणे

माझ्यासाठी तुम्ही मुलांनी
अगणित केल्या शब्दतुळा
शतकांहुनि मी अधिक भोगला
अम्रुताचा सुवर्ण सोहळा

अजूनही ना ओळख पटली
अपरिचित भासे तुझी दिठी"
हात धरूनी वदली व्रुध्दा
"मी तुझीच ती रे मायमराठी..."

कवी- संतोष अंकुश सातपुते
फोटो प्रेमाभार- कुंदाताई...






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १