रायगडावरील अद्भुत सावलीमंदीर

बा रायगडावर जाण्याची ती पहिलीच वेळ. मनी ना ना विचारांची झिम्मड उडालेली. मन एकीकडे आनंदाच्या पुनवॆत भिजत होते. आनंद याचा की पहिल्यांदाच त्या लोकोत्तर पुरूषोत्तम राजाने बांधलेल्या त्या गडपुरूषाचे दर्शन होत होते. शिवरायांनी मोठ्या जाणत्या चौकस नजरेनं चहुबाजूनं न्याहाळलेला हा दुर्ग. मोठ्या कवतिकानं स्वराज्य राजधानीसाठी बांधविलेला हा दुर्ग. पाच पातशाही मुंडक्यांचा महीष पायदळी निर्दाळून गगनभेदी गर्जना करणाऱ्या शिवराजाभिषेकाचा साक्षीदार असलेला हा दुर्ग. आपुल्या दुधाचा पूर्ण पुरुषार्थ पाहता जिजाऊंच्या नेत्रगंगांनी पुनीत झालेला तोच हा दुर्ग. हिरोजींच्या स्वामीनिष्ठेनं भारावलेला, गागाभट्टांच्या मंत्ररवानं धुमांकित झालेला. जिजाऊंच्या देहवसनानंतर सैरभैर झालेला. महाराज गेल्यानंतर पोरका झालेला हाच तो दुर्गदुर्गेश्वर रायगड. ज्यास मनमंदिरी पुजियेले तोच हा श्रीमद्रायगिरौ....

त्याचबरोबर मन स्वतला फोडत होते ते पश्चातापाच्या आसुडानं... कुणासाठी या राजानं जीवाची एवढी परवड केली? कुणासाठी या भाबड्या मावळ्यांनी आसुदाचे पाट लोटविले? घरादारावर तुळशीपत्र ठेऊन, स्वताच्या संसाराच्या होळ्या करून ही मंडळी झुंजली कोणासाठी? या स्वराज्यात जन्मास येणाऱ्या प्रत्येकानं मुक्ततेनं श्वास घ्यावा यासाठी. गुलामगिरीचा वाराही त्यांस लागू नये यासाठी. आपल्यासाठी. माझ्यासाठी.... मग मला इथं यायला इतका उशीर का? 

कर्नल प्रॉथरनं डागलेल्या तोफांनी रायगड नंतर जळाला, त्या आधी जळून खाक झाली ती इथल्या माणसांची मनं. नंतर जन्मास आलेल्या पिढीचं मन ईतकं मुर्दाड निपजलं, की ती लाल माकडं गड लुटून गेल्यावरसुद्धा कुण्या एकाची टाप झाली नाही इथं येण्याची.

मग सुरू जाहली वाताहात. जिथं कधीकाळी दंड, बलदंड मराठेशाही पोसली गेली त्याच जागी जोगावली कोल्ही , मुंगसाची वंशावळ. जिथं बत्तीस मणाचं सुवर्ण सिंहासन भर मध्यान्हीच्या सूर्याचे डोळे दिपवत होते, त्याजागी वाढीस लागले निवडुंग-करवंदीचे काटेरी बन. हयातभर ज्या राजानं महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी स्व:ताच्या सुखाचं अग्नीहोत्र केलं त्या राजाची समाधी दिवावातीविन अशीच पडून होती. विस्मृतीच्या भयाण अंधारी. एकेकाळी सदैव पंचामृताच्या अभिषेकात बुडणारा जगदीश्र्वर पाण्याच्या थेंबाविन कोरडा, ठणठणीत पडला. बेलफुलांनी गुदमरलेल्या त्याच्या माथी नंतर निर्गुडीचे त्रिदळही दुष्प्राप्य झाले. पडून राहीला बिचारा... घंटानादाची वाट पाहत.

एकेकाळी जिथे मराठ्यांची कुळवंत स्वातंत्र्यलक्ष्मी मोठया दिमाखानं मिरवली त्याजागी किचकिचत नाचू लागली अशकुनाची हडळ. उध्वस्ततेच्या जटा सोडून. औदास्यिन्याच्या पांढरट कपाळानं,गुलामगिरीमाखल्या पायानं.

वाटू लागलं कुठेतरी आपण, आपले बापदादेच याला जबाबदार. त्या पूर्वजांनी साधलेला एवढा आभाळभर इतिहास आपण डोळसभर जाणायचीही तसदी घेतली नाही.


विचारांनी पुरतं भंडावलं होतं. विचारांच्या त्याच तंद्रीत अंधारात बाजारपेठ मागे टाकून जगदीश्र्वराकडे निघालो होतो. तिथे टिमटिमणाऱ्या दिव्यामुळे मंदिराचा अदमास घेत वाट मागे टाकत होतो.

त्या तंद्रीतच मंदिरास वळसा घालून समाधीपाशी पोहोचलो. पावसाळा अगदीच हातातोंडाशी आलेला. आभाळ भरून आलेलं. शुक्लातील एकादस असूनही चंद्र मात्र आभाळाच्या धुमाळीत गडप झालेला. पश्चिम वाराही सुटला होता. अधुनमधून वीज तेवढी लखलखायची. तिच्या शुभ्र धवल प्रकाशात समाधीच्या डाव्या अंगास असलेली सह्याद्री घाटमाथ्याची बेलाग तटबंदी झळाळून दिसायची.  क्षणभर डोळे दिपले कि पुन्हा दिठीसमोर काळोख. त्या वीजेपुढे जगदीश्वराच्या नगारखान्यावरील हॅलोजन अगदिच केविलवाना भासत होता.

भवतीनं काळोख दाटलेला. त्या हॅलोजनचाच काय तो प्रकाश. पण तो तरी कितीसा पुरणार. नाही म्हणायला त्याच्या उजेडात महाराजांची समाधी झावळी दिसत होती. चौघेही शांतच होतो. 

आजुबाजूला लावलेलं बांबुंचं कुंपण मनास कष्टवित होतं. इथही कुंपन. ज्या राजानं उभ्या हयातीत रयतेला भेटण्यापासून कसली कुंपनं पाळली नाहीत, त्या राज्याच्या समाधीपाशी ही कुंपनं....

असं वाटत होतं, त्यांनी समाधीतून ऊठावं... डोळेभरी मला पाहावं.. मी ही त्या आभाळाएवढ्या पराक्रमी राजास दिठी न लवविता न्याहाळील. त्यांनी "लेकरा" म्हणून मज उराशी धरावं.  मग काही बोलणं नकोच. त्या मिठीत मरण आलं, तरी माझ्याविन जगी भाग्यवंत ना कोणी.

अलंकार, विशाल, सागर अष्टकोनी चौथरीवर चढले. मी खालीच होतो. त्या तिघांनी महाराज्यांच्या आतील शिल्पास मुजरा केला. त्यावेळी पुन्हा मागे वीज कडाडली. इतकं अप्रतिम दृश्य. समोर ही चिरेबंदी समाधी. त्यास मुजरा करणारे हे तिघे आणि मागे चंदेरी प्रकाशात चमकलेला सह्याद्री. क्षणापुरती भेट. आभाळानं फोटो काढताना बहुधा फ्लॅश मारला असावा.

ज्या दैवतास आजवर पुजीलं त्यास प्रदक्षिणा घालावयास मन सांगू लागलं. पण भोवती कुंपनाचा हा अडसर. मग मात्र राहवेना. मी ही चौथरीवर आलो. मुजरा केला. आणी चौथरीवरूनच प्रदक्षिणा घालण्याचं ठरविलं. मुजरा करून आम्ही समाधीच्या डाव्या बाजूनं वळसा घालण्याच्या बेतात असतानाच पुढं असलेला अलंकार अचानक ओरडला.....

"हे बघ.... बाबा..रे"
विशाल, सागरदेखिल ते पाहून थक्क झाले. काय आहे म्हणून मी ही सरसावलो. आणि दिठीस जे पडलं ते केवळ अद्भुत, अतर्क्य होतं. आम्ही सगळेच मंत्रचळ मारल्यासारखे ते निरखित होतो.

जगदीश्वर मंदिराच्या नगारखान्यावरून महाराजांच्या समाधीवर जो वीजेचा प्रकाशझोत टाकला होता त्यामुळे समाधीची भली मोठी सावली समाधीच्या मागील बाजूस अवतरली होती. हो सावली अवतरलीच होती. कारण साधारण सावली कोणत्याही आधाराविन जमिनीवर उभी राहत नाही. आडवी पसरते. म्हणून तर आपण सावली पडली म्हणतो. पण महाराजांच्या समाधीची ही सावली मात्र पूर्णतः उभी. ती ही कुठल्या आधाराविन.


जे त्या दिवशी पाहिलं ते रेखाटण्याचा प्रयत्न



खाली चौथरीचा भला प्रशस्त पाया. समाधीचे बाजूचे खांब म्हणजे अवाढव्य स्तंभ. आणि वरील मेघडंबरी म्हणजे घुमटाकार कळस. जणू प्रचंड भलमोठ्ठं सावली मंदिरच सामोरी उभं ठाकलय. त्याचा आकार केवढा तर, शिबंदीच्या घरटाण्याशी त्याचा पाया आणि वर उंच गगनावेरी भिडलेला समाधीच्या मेघडंबरीचा कळस.

ती मंदिराची काळी प्रतिमा सोडता बाकी आजुबाजूस धुक्याचे ढग झुलत होते. मंदिराबाहेर गजांतलक्ष्मी झुलावी तसे. जणु धुक्यातूनच ते प्रचंड मंदिर हळुहळू अवतरत आहे. आधी धवळलेले दिसणारे त्याचे रूप पालटून नंतर अगदी बांधीव ठसठशीत झाले.


आम्ही सगळेच मंत्रमुग्धपणे निसर्गाचा ती कलाकुसर पाहत होतो. झावळ्या ढगांच्या कागदावर चितारलेली ती सावली मंदिराची सुबक, ठाशीव, कळाशीदार आकृती. असलं अप्रुप मी कधीच पाहीलं नव्हतं. कोणत्याही गोष्टीची सावली आधाराविन उभी कशी राहू शकते. दोपहारी मोकळवनात जरी थांबलो तरी सावली जमिनीवर पसरते. पण इथं मात्र भल्याभल्यांचा तर्क थांबावा असा प्रकार.

महाराजांच्या सावलीचं केवढं ते विराटदर्शन. बरं गमतीची गोष्ट पुढेच. हॅलोजनचा प्रकाश केवळ समाधीवरच नव्हता. आम्हीही बाजुलाच ऊभे होतो. पलिकडे वाघ्या कुत्र्याची समाधी होती. आमची व वाघ्या कुत्र्याची सावली मात्र पुढील माळावर आडव्या पांगल्या होत्या. पण महाराजांच्या समाधीचं हे भव्य सावलीमंदिर उभेच्या उभे. आभाळास भिडलेले. सर्वांचेच हात जुळले. मघाशी समाधीस जो मुजरा केला त्यात प्रेम, आदर, निष्ठा होतीच पण आताच्या नमस्कारात होतं एक प्रकारचं भारावून जाणं. छत्रपतींच्या समाधीचं ते अद्भुत सावलीमंदीर ... खरच प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट अशीच.

त्यानंतर चौघेही भानावर आलो. सागर, विशालने मोबाइलमध्ये त्या सावली मंदिराचे फोटो घ्यायला सुरूवात केली. पण त्या सावली मंदिराचा फोटोच स्क्रीन वर येत नव्हता. नुसताच अंधार फोटो..पुन्हा वीज कडाडली क्षणभर लख्ख प्रकाश. सर्व अदृश्य. मग पुन्हा काळोख पसरता ते अवतरलं.


अचानक वारा वाहू लागला. मागील मोकळवनातून ढग धावू लागले. त्यामुळे सावली मंदिर ही गढुळले. त्याचा ठाशीवपणा जाऊन झावळं रूप आलं. हळुहळू ते सावलीमंदीर धुरकट, अस्पष्ट होत होत अंधारातच विरघळलं. कोणताही मागमूस मागे न ठेवता. 

बहुधा तो नैसर्गिक चमत्कार असावा किंवा इंद्रवज्राचा प्रकार. पण त्याचे दर्शन मात्र आम्हा नशीबी आले. साक्षात् शिवरायांच्या समाधीचं असं दर्शन. त्याचं वर्णन तरी कसं करावं. कारण शब्द फक्त माहिती पुरवतात. अनुभव नाही देऊ शकत. त्यासमयी ते जे अनुभवलं ते अनुपमेय, अशब्देय, अव्यक्तेय....असच होतं.

ज्या ज्या मित्रांस मी हा अनुभव सांगितला त्यांचा रायगडी आल्यावर पहीला आग्रह असतो सावलीमंदीर. पण प्रत्येकवेळी आम्ही रित्या हातानच परततो. 

पहिल्याच भेटीत बा रायगडानं आणि महाराजांनी मज दुबळ्याची झोळी या अमूल्य दानानी शिगोशीग भरून दिली. पुढे ऊतारवयी जेव्हा या सख्यासह्याद्रीच्या आठवणींची भरगच्च शिदोरी सोडायला बसेल त्यावेळी न चुकता पहिली गाठ सुटेल ती या सावली मंदीराचीच.....


लेखन- © संतोष अंकुश सातपुते

Comments

  1. लेख वाचून परत एकदा ती घटना हुबेहूब डोंयांसमोर उभी राहिली,अंगावर काटा आला,शब्द सुचत नाहीत...

    ReplyDelete
    Replies
    1. दादा तुमच्या रिप्लायची वाट पाहत होतो. धन्यवाद....

      Delete
  2. मी काय लिहावं आता, तुम्ही किती अप्रतिम अनुभवलं आणि ते आमच्यापर्यँत पोहचवलं !😍😍❤️

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे

      Delete
  3. जय शिवराय जय शंभूराजे
    खूप छान
    असे दर्शन आम्हाला ही मिळो हिच शिवचरणी प्रार्थना

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की माझीही शिवचरणी हीच प्रार्थना

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवराजाभिषेक

माझे माहेर रायगड

दुर्गराज राजगड भाग १