दुर्ग तिकोना (वितंडगड)
(तिकोनागडाचे श्री. सुजित मोहोळ तसेच अनेक निष्ठावंत शिवदुर्ग गडपाळास बहुत आदरे अर्पण)
मावळखोरी, कोळवनप्रांती वसे तिकोनापेठ
या गावातून सडक धावती तिकोनागडासी थेट
तीन दिशानी, तीव्र उतार बुधला माथ्यावरी
समाधीस जणू शंकर बसला जटा बांधुनी शिरी
त्या शिवकंठातील सर्पहारांसम घेऊन आढेवेढे
वळणवाट ही नेई सळसळत तिकोना शिखराकडे
ही खिंडारे , भग्न हे चिरे ढळले जरी हे असे
परी यांच्यावरती अभेद्य उमठले शिवकाळाचे ठसे
जे अजुनी नाही आले मिटविता काळाच्य फेऱ्याला
तो ही काफतो थांबत नाही शूरांच्या वाऱ्याला
हा हात उचलुनी, शेंदूर लेवुनी उभा महा बलवान
या दुर्गासी सदैव रक्षिण्या सज्ज वीर हनुमान
जपून पायऱ्या, चला पुढे पहा पांडवकालीन लेणे
कातळ उदरी, अमृतजल मायेचे साठवी पान्हे
चिंचोळ्या पायऱ्या, उभी चढण ती येई छातीवर
जपुनी आहे, वीर श्वासांची उरी तप्त फुंकर
बुरूज, जंग्या अवतीभवतीनं तटबंदी कणखर
गडास रक्षिती, गुंफून भवती दगडांचे निजकर
ऐकू येतील त्या बुरुजांवर जागल, गस्त, आरोळ्या
ज्या जाहल्या या स्वराज्यदेवा जागविण्या भूपाळ्या
पसार मोकळी, पैस भूमी ती अन उजव्या हाताला
बुधल्यासि पायऱ्या वळसा देऊन नेई गडमाथ्याला
तोल सावरून, त्यांच्यावरुनी येता माथ्यावर
बालेकिल्य्यांवर नंदीसह दर्शन देई वितंडेश्वर
याचकारने वितंडगडही म्हणती गडास कोणी
शिवभूपाच्या स्वराज्याची ही जडाव राजसलेनी
फिरता वरुनी नीट न्याहाळा दिसेल ते सभोवार
तुंग, लोहगड पैल विसापूर राजांचे शिलेदार
भगवा ध्वज तो ऐन शिरावर फडफड करी वाऱ्यानी
छत्रपतींचा शौर्य पराक्रम गर्जून सांगे कानी
अभिमान वाटतो या साऱ्याचा असे मी हो गडपाळ
राखील शान मी करील तयाचा प्राणाहुनी सांभाळ.....
राखील शान मी करील तयाचा प्राणाहुनी सांभाळ.....
संतोष सातपुते
९५४५८६४०५६
मस्त रे , असच लिहीत रहा... तुझ्यावर प्रभाव असणाऱ्या दांडेकर शैलीत खूप काही वाचायला आवडेल .
ReplyDeleteनक्कीच भाऊ
Delete