माझे माहेर रायगड

पावसाळा नुकताच ऊंबरठ्यावर येऊन ऊभा राहीलेला. चार सहा पाऊस गाठभेट घेऊन गेलेले. त्यावेळी मी, केतन, सागर, नंदन चौघेही रायगडी निघालो. मुक्काम किती? ऊणेपुरे आठ दिवस! ते आठ दिवस आम्ही शिवकाळातच जगत होतो.कोणी विचारेल काय केलं रायगडी या आठ दिवसात? तर काहीच नाही! चौघेही सासुरवाशीनीसारखे संसार सोडून माहेराला आलो होतो. माहेरी थोडीच काय करायचं असतं! ईथं फक्त बागडायचं! माहेरच्या गोतावळ्यात मनमुराद रमायचं! त्यांच्याकडून फक्त लाड पुरवून घ्यायचे. दिवस, तारीख, वेळ यांच्याशी काडीमोडच घेतलेला. कोणीही विचारावं आज दिवस कोणता? फिरायचा! आणि सकाळ, दुपार, सांज, रात्र याशिवाय दूसरी वेळ नव्हती. सकाळी ऊठून बाम्हण वाड्याच्या ओहोळेनी खाली वाघदरवाज्याकडे निघायचं. ही वाट जरा अडचणीची! तरी निघायचो. मरणाची खेकडं गोळा करीत. पावसानं झऱ्यांना पाझर फुटलेला. वर ओहोळेच्या ऊगमाशी थेंबथेंब ठिपकणारं पाणी खाली मोठमोठ्या डकल्यातून शिगोशिग भरून वाहावयाचं. इथं भडाभडा पाणी अंगावर घेत आंघोळी ऊरकल्या की आम्ही वाऱ्यासारखे गडावर दसदिशी ऊंडारायला मोकळे. जायचं कुठं हा प्रश्नच पडत नव्हता. फुटतील त्या वाटेने अथवा वाट नसेल...