शिवराजाभिषेक

शिवराजाभिषेक! केवळ एका व्यक्तिस सिंहासनावर बसविण्याचा हा सोहळा मुळीच नव्हता. ती होती एक संकल्पपूर्ति! माहुलीवर पदरी वैफल्य आलेल्या शहाजीराजांची संकल्पपूर्ति! पुण्याच्या काळजात रूतलेली पहार ऊपसणाऱ्या जिजाऊंची संकल्पपूर्ति! रोहिडेश्वराच्या गाभाऱ्यात एका चिमुरड्याने घेतलेल्या भीष्मप्रतिज्ञेची नि त्यासाठी ऊपसलेल्या भगीरथ प्रयत्नांची संकल्पपूर्ति... स्वामीनिष्ठेपुढे बादशहाचा कौल लाथाडणाऱ्या मुरारांची! गजापुरच्या खिंडीत तोफेच्या सरबत्तीची वाट पाहणाऱ्या बाजींची! क्षणात वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजींची! येसाजी! तानाजी! शिवा- बाजींची संकल्पपूर्ति! या मातीसाठी जिवाचा बेलभंडारा ऊधळणाऱ्या कित्येक ज्ञात- अज्ञात वीरांची संकल्पपूर्ति! कैक सुवासिनींच्या सुन्या कपाळांची संकल्पपूर्ति! कैक मातांच्या विझलेल्या वंशदिव्यांची संकल्पपूर्ति! या अवघ्या अवघ्यांची संकल्पपूर्ति मूर्तिमंत रूपात अवतरली या रायगडी! रामदेवराय यादवाच्या रूपानं पदच्यूत झालेली महाराष्ट्र अस्मिता शिवछत्रपतींच्या रूपानं पुन्हा मानानं सिंहासनाधिष्ठीत झाली. देवगिरीवर मरणासन्न झालेल्या महाराष्ट्रधर्मास या रायगिरीवर नव...