Posts

Showing posts from September, 2019
Image
वाळसुऱ्याची खिंड गाठेपर्यंत चांगलच अंधारलेलं. अंधारातच खिंड चढू लागलो. दिवस ज्येष्ठाचे. म्हणजे रायगड पट्ट्यात तर ढगलोटीचे नि पाऊसफुटीचे. ठरवलेलं पावसानं गाठण्याआधी गड गाठायचा. त्याच बेगीनं पावलं ऊचलत होतो. अंधारी बुडालेला समोरचा हिरकणीकडा अंगावर येत होता. पायठण्या चढून महाद्वारापास आलो. अन् हबकलो. दिक्क ऊत्ताल चिऱ्यांच्या गगनठाव बुरूजभिंती. त्याचं ते भारदार सौष्ठव! नागमोडी वळसा घेत ऊजव्या बाजूस वळलेली. या बांधणीत नुसता भारदस्तापणा नाही तर पिळदारपणाही. पुढे अधिक गच्च अंधार. आणि या अंधारभरल्या विहीरीच्या बेचक्यात मी अंगठ्याएवढा माणूस. असल्या मरणकाळ्या रात्री या महाद्वाराच्या काळोखात पाऊल टाकायची हिंमत होईना. क्षणभर वाटलं असच माघारी फिरावं. या महाद्वाराच्या काळखिंडीतून बाहेर पडावं. पण क्षणभर. मग निश्चय केला. नि नेटानं त्या बेचक्यातच थांबलो. थोडं स्थिर झाल्यावर चळणारं मन एकाठायी झालं. हे महाद्वार पाऊल वर्तमानात टाकत असलो तरी पावलांमागं भूतकाळाचा फुफाटा ऊडत होता. कसं घेतलं असेल या आडदांड महाद्वाराचं मोजमाप. कसा ओळंबा लावला असेल या भिंतींना. कसा आखला असेल याचा आराखडा. कुठे असतील ते...

सह्याद्री... सोनकी... आणि मी...

Image
ऐन श्रावण भाद्रपदातील सह्याद्री न्याहाळण्याची तुलना जगी एकाच गोष्टीशी. ऐन श्रावण भाद्रपदातील सह्याद्रीशीच. कारण त्यास जगी अन्य ऊपमा निदान माझ्यालेखी तरी नाहीच. वैशाखाचा वणवा चहूकडून धडाडलेला. पळस, पांगारा, काटेसावरीच्या तांबड्या फुलांनी तर जणू सबंध डोंगरास वणव्याची धार लागल्यासम. भुई गरम ऊसासे टाकीत असते. रानात आडवाटेस वाऱ्याच्या वावधुळी ऊठत असतात. स्वतःभोवती गरागर गिरक्या घेत रानभर गदळ ऊडवित असतात. अवघ्या कातळकड्यांवर पिवळट, पांढुरकं गवत भुरभुरत असतं. जणू म्हाताऱ्याच्या रापलेल्या कातडीवरील पांढरे केस. अचानक एकादिवशी तापलेल्या जमिनीतून मिरगाच्या किड्यांची लगीनघाई सुरू होते. काळसर मातीतून तांबडेलाल रोहिणीचे किडे तुरूतुरू चौदिशी धाव घेतात. अन् काळ्या ढगांचे पाव्हणेरावळे मावळतीहून घाटमाथ्यास जत्रेला निघावं त्या बेगीनं निघतात. नव्या नवरीवानी लाचत लाजत ज्येष्ठ या पश्चिमघाटाचं माप ओलांडतो. अन् चहुकडे तांदूळ सांडावे त्यारितीनं ढग सांडू लागतात. तापल्या तव्यावर गार पाण्याचा शिपकारा बसताच चर्र वाजतं, तसाच आवाज या तापल्या कातळातून घुमतो. ज्येष्ठाची नवलाई सरते नि झांझरतो आषाढाचा धसमुसळेपणा....