माय किस्नाबाई...

हे कवितापुष्प कोल्हापुरातील महापुरात जे वाहून गेले त्यांच्या आत्म्यास नि जे जिवंत आहे त्यांच्या कणखर रांगड्या हिमतीस अर्पण... जिच्या कटीखांद्यावर आजवर पोसलो, वाढलो. निर्भयपणे सुखावलो त्याच क्रुष्णामाईच्या रौद्ररूपानं अनेक संसाराची वाताहात झाली. गावच्यागाव पोरकी झाली. या महापुरानं जिभल्या चाटीत अगदी सगळं सगळं धुऊन नेलं. पण तो नेऊ शकला नाही त्यांची रांगडी हिंमत, न बुडणारा स्वाभिमान नि न आटणारं किस्नामाईवरील अपार अपार प्रेम. त्याच पुरात एका माऊलीनं जे अनुभवलं ते. माय किस्नाबाई, का गं कोपली भयाण गाव गोकूळ गं माझा, का गं केलास मसान तुझ्या मायेनं पोसल्या, हितं पिढ्यापिढ्या कैक भाळावरी गं कोरड्या, लिव्हला हरिताचा लेखं तोच पुसूनीया आज, का गं केली अशी दसा सांग कशी गं सुचली, आई तुला अवदसा? तुझ्या कडे कटीवरी, व्हतो जगत मानानं काळ्या शिवारी खपत, राबत, भिजत घामानं काडी काडी जमविली, परि आभाळ फाटलं कशी सांगू तुज दैना, दुःख ऊरात दाटलं गाडगी खापराचा बाई, माझा दुबळा संसार तुझ्या पाव्हणचारास, कसा पुरा पडणार टाकूनीया दूर तीर, का गं वलांडल्या येशी सानं, थोरं, गुरं, ढोरं, गेली ...