अगं ऊठ बाई...

अगं ऊठ गं बाई! ऊठ लवकर. एवढं काही झालं नाही आ तुला. जखमांचेच तर घाव ओरबाडलेत सबंध शरीरभर फक्त. रक्तबंबाळच तर झालय अवघं शरीर फक्त. मांसाची लक्तरच तर चिंधड्यांसारखी लोंबतायेत फक्त. आणि.... आणि बलात्कारच तर झालाय फक्त... यात एवढं विशेष काय? आजकाल तर हा टाईमपासाचा विषय आहे. च्युईंगमसारखा एक दिवस चघळू नि रस संपला की टाकू थुंकून. बलात्कारासारख्या फालतू विषयाला यापेक्षा जास्त किती दिवस द्यायचे. हा ते जर एखाद्या राजकारण्याचं सर्दी पडशासारखं महत्वाचं असतं. किंवा सेलिब्रेटीच्या पोरांचं हगणं, मुतणं असतं तर ठिक. पण तुझ्या बलात्कारात इतकं काय इंट्रेस्ट किंवा ब्रेकिंग न्यूज नाही आम्हाला. वाटलं तर ते मेणबत्त्या वैगेरे पेटवू किंवा काळे डिपी, मोर्चे काढू. पण वाटलं तर हा. तू ही फार अपेक्षा न ठेवलेलीच बरी. या आभासी जगात वावरताना वेळच नाही गं आमच्याकडं या नग्न वास्तवाकडं पहायचा. अगं ऊठली नाही तू! कुणाची वाट पाहतेय? आमची! अगं आमचा तर तुझ्या रक्तबंबाळ देहासोबत केव्हाच सेल्फी घेऊन झालाय्. कधी? मघाशीच. ते बेशुद्ध होती तेव्हाच. त्याला झक्कास कैप्शन लिहून टाकलाही मी स्टेटसला. भरपूर लाईक्स मिळतायेत. बघ तु...